महिनाभरात २५ गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई
By Admin | Updated: May 21, 2014 04:34 IST2014-05-21T04:34:03+5:302014-05-21T04:34:03+5:30
गेल्या महिन्याभरात आर. ए. किडवाई मार्ग, सायन, माटुंगा आणि अॅण्टॉप हिल या परिमंडळ ४मधील पोलीस ठाण्यांकडून या परिसरातील २५ गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली

महिनाभरात २५ गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई
मुंबई : गेल्या महिन्याभरात आर. ए. किडवाई मार्ग, सायन, माटुंगा आणि अॅण्टॉप हिल या परिमंडळ ४मधील पोलीस ठाण्यांकडून या परिसरातील २५ गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाई करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर हाणामारी, हत्येचा प्रयत्न, घरफोडी, लूटमार असे विविध गुन्हे दाखल आहेत. निवडणुकीपूर्वीच या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. यात एका महिलेचा समावेश आहे. आर. ए. किडवाई पोलिसांनी पाच सोनसाखळी चोरांना अटक केली, तर सायन पोलिसांनी ज्वेलरी शॉपच्या दुकानात दरोडा टाकल्याप्रकरणी साबीर शेख, अन्वर हुसेन, माणिक शेख, मोहम्मद या चौघांना अटक केली होती. १४ एप्रिलला अॅण्टॉप हिल परिसरात दोन गटात हाणामारी झाली होती. त्या प्रकरणी अॅण्टॉप हिल पोलिसांनी दंगलीचे दोन गुन्हे दाखल करून पन्नालाल यादव, विजय परळेकर, सुरेश गुजर, सुशांत काप, दर्शन नाघांवकर, अजित कांती, रूपेश परळेकर आणि सुनिल पाटील या आठ जणांना अटक केली.