जादूटोण्यातून महिलेच्या हत्येचा संशय

By Admin | Updated: December 18, 2015 02:11 IST2015-12-18T02:11:23+5:302015-12-18T02:11:23+5:30

देवनार परिसरात सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेची हत्या गळा चिरून झाल्याचा प्राथमिक अंदाज शवविच्छेदन अहवालातून समोर आला. या महिलेचे रेखाचित्र तयार करण्यात

Witchcraft suspected of murder of woman | जादूटोण्यातून महिलेच्या हत्येचा संशय

जादूटोण्यातून महिलेच्या हत्येचा संशय

मुंबई : देवनार परिसरात सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेची हत्या गळा चिरून झाल्याचा प्राथमिक अंदाज शवविच्छेदन अहवालातून समोर आला. या महिलेचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. त्यात महिलेच्या सुटकेसमध्ये सापडलेल्या ताविजवरून जादूटोण्यातून तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. त्या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर असलेल्या इंडियन आॅइल कॉलनीतील नाल्यामध्ये मंगळवारी दुपारी सापडलेल्या दोन सुटकेसमध्ये महिलेचे तुकडे केलेला मृतदेह पोलिसांना सापडला होता. शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात शव पाठवण्यात आले होते.
प्राथमिक अहवालानुसार, या महिलेची २४ ते ३६ तासांपूर्वी गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचे हात तोडून हे अवशेष दोन बॅगांमध्ये भरण्यात आले. या अहवालाच्या आधारे व मृत महिलेच्या केसांमध्ये असलेल्या जटा आणि मृतदेहाच्या अवयवांसोबत ताविज सापडले आहेत. हे पाहता हा प्रकार अंधश्रद्धेतून तसेच जादूटोण्याचा असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.
ओळख पटविण्यासाठी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरातील हरवलेल्या महिलांची माहिती गोळा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Witchcraft suspected of murder of woman