Join us  

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबरपासून, दोन दिवस चालणार कामकाज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 5:20 PM

Maharashtra News : विधिमंडळाचे अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवस चालणार आहे. तसेच हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे.

मुंबई - कोरोनाच्या काळातील निर्बंधांचा फटका इतर क्षेत्रांप्रमाणेच विधिमंडळाच्या अधिवेशनालाही बसला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन थोडक्यात आटोपल्यानंतर आता हिवाळी अधिवेशनालाही कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनाच्या संकटामुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दोन दिवसांत आटोपण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवस चालणार आहे. तसेच हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे नियोजन करण्यासाठीची तयारी विधिमंडळ कामकाज समितीकडून सुरू होती. दरम्यान, आज झालेल्या विधिमंडळ कामकाज समिती बैठकीत अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यावेळचे विधिमंडळाचे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच होणार आहे. तसेच हे अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवसच चालणार आहे.

दोन दिवसांचं अधिवेशन म्हणजे चर्चेपासून पळ, फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीकादरम्यान, राज्यात कोरोना विषाणूच्या फैलावामुळे वर्षभरात तिसऱ्या अधिवेशनाला थोडक्यात आटोपावे लागत आहे. मार्च महिन्यात कोरोनाला सुरुवात झाल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर आटोपावे लागले होते. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पावसाळी अधिवेशन लांबणीवर टाकावे लागले होते. अखेरीस सप्टेंबरमध्ये विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन थोडक्यात आटोपावे लागले होते.

टॅग्स :महाराष्ट्र सरकारविधान भवनविधान परिषदविधानसभा