भारतीय हवाई उद्योगाला विकासाचे पंख; खासगी अथवा चार्टर्ड विमानांच्या संख्येतदेखील वाढ 

By मनोज गडनीस | Updated: May 4, 2025 07:30 IST2025-05-04T07:30:40+5:302025-05-04T07:30:47+5:30

विमानांची वाढती संख्या, विमानतळांची वाढती संख्या विचारात घेतली तर या क्षेत्रात १० वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. 

Wings of growth for the Indian aviation industry; Increase in the number of private or chartered aircraft | भारतीय हवाई उद्योगाला विकासाचे पंख; खासगी अथवा चार्टर्ड विमानांच्या संख्येतदेखील वाढ 

भारतीय हवाई उद्योगाला विकासाचे पंख; खासगी अथवा चार्टर्ड विमानांच्या संख्येतदेखील वाढ 

- मनोज गडनीस 
विशेष प्रतिनिधी
१९९० च्या दशकातील गोष्ट आहे. आपल्या ओळखीतल्या एखाद्या व्यक्तीने जर विमानाने प्रवास केला तर त्याची चर्चा व्हायची. पण, जागतिकीकरणानंतर दैनंदिन जीवनशैलीला जशी आधुनिक गोष्टींची झळाळी मिळाली आणि जीवनमान उंचावले तसे मोबाइल फोन, आलिशान गाड्या, मोठी घरे आणि विमान प्रवास या गोष्टी नित्याच्या झाल्या. विविध क्षेत्रांमध्ये विकासाचे वारे वाहू लागले तसेच वारे भारतीय हवाई क्षेत्रातदेखील वाहू लागले आणि पाहता पाहता गेल्या १० वर्षांमध्ये भारतीय हवाई क्षेत्राने जागतिक पातळीवर तिसरा क्रमांक गाठला.

अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांनंतर आता भारत आहे. सरत्या १० वर्षांत या क्षेत्राचा कायापालट झाला. या क्षेत्राचा विकास हा केवळ विमानांच्या वाढलेल्या संख्येतून दिसून आला नाही तर या क्षेत्राचा सर्वंकष विकास झाला. गेल्या १० वर्षांत देशातील विमानतळांची संख्या ७४ वरून १५७ झाली. तर, २०४७ पर्यंत ३५० ते ४०० नव्या विमानतळ उभारणीचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या नव्या विमानतळांची निर्मिती करताना प्रामुख्याने देशातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांचा विचार करत तिथे त्यांची निर्मिती करण्यात आली. परिणामी, देशाच्या अनेक भागांत नव्याने हवाई जोडणी तयार झाल्यामुळे त्याचा थेट फायदा प्रवासी संख्या वाढण्यात झाला. गेल्या वर्षी १६ कोटींपेक्षा जास्त लोकांनी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय मार्गांवर प्रवास केला. प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे भारतीय विमान कंपन्यांनीही नव्या विमानांची खरेदी सुरू केली आहे. २०३० या वर्षापर्यंत भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात किमान नवीन दीड हजार विमाने दाखल होतील.  

विमानांची वाढती संख्या, विमानतळांची वाढती संख्या विचारात घेतली तर या क्षेत्रात १० वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. वैमानिकांच्या भरतीचा जरी विचार केला तरी वर्षाकाठी किमान ५०० नव्या वैमानिकांची गरज या उद्योगाला लागणार आहे. तर अन्य विभागांतील मनुष्यबळदेखील हजारोंच्या घरात विमान कंपन्यांना उभे करावे लागणार आहे. त्यातच अलीकडे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने वैमानिक होण्यासाठी आता कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील दारे खुली करण्याचे संकेत दिले आहेत. 

खासगी अथवा चार्टर्ड विमानांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. आज देशात छोटेखानी विमाने आणि खासगी हेलिकॉप्टरची संख्या ४००च्या घरात आहे. काही तासांसाठी लाखो रुपये मोजत अनेक लोक या सेवेचा लाभ घेत आहेत. भविष्यात जरी विमान उद्योगाचा विकास अधिक सकस होणार असला तरी सध्याच्या घडीला प्रवाशांची वाढती संख्या आणि उपलब्ध विमानांची संख्या याचे गणित काही प्रमाणात व्यस्त आहे. त्यामुळे विमान प्रवाशांचे कर्मचारी आणि प्रवासी यांच्यामधील वादाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 
यात सर्वस्वी चूक ही विमान कंपन्या किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांचीच आहे असे नव्हे, तर त्यांची अपरिहार्यता आणि त्यांचे माणूस असणे प्रवाशांनी समजून घेणे गरजेचे आहे. रेल्वेच्या शौचालयातील टमरेल साखळीने बांधून ठेवण्याची व्यवस्था असलेल्या आपल्या देशात लोकांनी प्रवासादरम्यानचे टेम्परामेंट वाढविण्याची गरज आहे. जबाबदार प्रवासी म्हणून नकारात्मक प्रतिमा पुसणे आणि सकारात्मक प्रतिमा निर्माण करणे ही आपलीदेखील जबाबदारी आहे. कारण एकेकाळी विमान प्रवास ही चर्चेची गोष्ट असली तरी आता ती नित्याची गोष्ट झाली आहे.

Web Title: Wings of growth for the Indian aviation industry; Increase in the number of private or chartered aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान