Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यांसह मिठीच्या सफाईवर हवा सीसीटीव्हीचा ‘वॉच’ - सर्वसामान्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 02:23 IST

मुंबई : पावसाळ्यास अवघा महिना शिल्लक असतानाच, आता मुंबई शहर आणि उपनगरातील नालेसफाईसह मिठीच्या साफसफाईने पुन्हा एकदा डोके वर ...

मुंबई : पावसाळ्यास अवघा महिना शिल्लक असतानाच, आता मुंबई शहर आणि उपनगरातील नालेसफाईसह मिठीच्या साफसफाईने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. महत्त्वाचे म्हणजे, किती गाळ काढला आणि किती गाळ काढायचा आहे? याचे आकडे महापालिका आयुक्तांच्या मासिक बैठकीतून अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे केवळ आकडे दाखवून साफसफाई दाखविण्याऐवजी मोक्याच्या ठिकाणी करण्यात येणारी साफसफाई ही सीसीटीव्हीच्या निगराणीखाली करण्यात यावी; अशी सर्वसामान्य रहिवाशांसह सामाजिक संघटनांनी केली आहे, पण या मागणीस महापालिका प्रशासन कसा प्रतिसाद देते? हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.नुकतेच महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पावसाळा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत छोट्या नाल्यांतून ३० एप्रिलपर्यंत एकूण ४१ हजार ९२५ टन गाळ काढत वाहून नेण्यात आला आहे, तर मोठ्या नाल्यासह मिठी नदीतून १ हजार ४८ हजार ६६४ टन गाळ काढून वाहून नेण्यात आला आहे. तत्पूर्वी महापालिकेने बैठक घेत, हे आकडे सादर करण्यापूर्वीच राजकीय पक्षांकडून नालेसफाईच्या कामाचा पाढा वाचत टीकाही करण्यात आली. परिणामी, पालिकेने केलेल्या कामाचा पाढा वाचत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण सेवाभावी संस्थांकडून महापालिकेच्या कारभारावर सातत्याने टीका केली जात आहे.तर काही प्रमाणात का होईना फरक पडेल!मिठी नदी असो किंवा नाल्यांमधील गाळ काढणे असो. गाळ काढून त्याच ठिकाणी पुन्हा टाकलो जातो. यात सर्वसामान्यांचा पैसा वाया जात आहे. गेल्या वर्षीच मी सातत्याने याबाबत आवाज उठविला होता. मात्र, कंत्राटदार आणि महापालिका यांच्यात साटेलोटे आहे. परिणामी, गाळ काढण्याचे नीट होत नाही. सीसीटीव्हीच्या निगराणीखाली गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले, तर काही प्रमाणात का होईना फरक पडेल, असे वॉचडॉग फाउंडेशनचे गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले.फक्त कागदोपत्री नोंद!पावसाळा सुरू होण्यापूर्वी कुर्ला पश्चिमेकडील क्रांतिनगर नगरलगतच्या मिठी नदीचे पाणी ऐन पावसाळ्यात लगतच्या घरात शिरू नये, म्हणून येथील गाळ काढण्याचे काम सुरू केले जाते. मात्र, पूर्ण गाळ काढण्याऐवजी वरवर साफसफाई करत, कागदोपत्री गाळ काढल्याची नोंद होते. मात्र, मोठ्या पावसाळ्यात मिठी ओव्हर फ्लो झाल्याने लगतची छोटी गटारे, नाले भरतात आणि पाणी लगतच्या वस्तीमध्ये शिरते. परिणामी, सीसीटीव्हीच्या निगराणीखाली गाळ काढला, तर पारदर्शी कारभार होईल आणि वस्तुस्थिती समोर येईल. महत्त्वाचे म्हणजे मिठीलगत वास्तव्य करत असलेल्या नागरिकांना त्रास होणार नाही, असे कुर्ला येथील रहिवासी राकेश पाटील यांनी सांगितले.मुळात मुंबई महापालिकेमार्फत मिठी नदीसह छोट्या आणि मोठ्या नाल्यांमधील गाळ काढला जात असला, तरी कागदावरील आकडेवारी आणि प्रत्यक्ष ठिकाणी झालेले काम यात मोठी तफावत असते. अनेक वेळा नाल्यांसह मिठीतून काढण्यात आलेला गाळा काठावरतीच ठेवला जातो आणि हा गाळ उचलण्यापूर्वीच मोठ्या पावसात तो पुन्हा नाला किंवा मिठीतून वाहून जातो.परिणामी, नाले आणि मिठी कायम गाळातच राहते. या कारणात्सव प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली गाळ काढणे शक्य नसले, तरी मरोळ, कुर्ला क्रांतिनगर, वाकोला नाल्यासह उर्वरित ठिकाणांवरील महत्त्वाच्या परिसरातील गाळ सीसीटीव्हीच्या निगराणीखाली काढण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.आपत्कालीन तयारी!खासगी, शासकीय, निमशासकीय परिसरातील झाडांची निगा घेण्याची जबाबदारी संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्यांची असते. पावसाळ्यात झाडे पडून हानी होण्याची शक्यता असते. परिणामी, संबंधितांनी महापालिकेच्या परवानगीने अवास्तव वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात.आपत्कालीन परिस्थितीची संभाव्यता लक्षात घेत, महापालिकेच्या २४ विभागांमध्ये आकस्मिक निवारा ठिकाणे निर्धारित करण्यात आली. दरडी कोसळण्याचा धोका असतो. अशा ठिकाणी इशारा देणारे फलक लावावेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय/निमशासकीय यंत्रणांशी सुसमन्वय साधण्यात यावा आणि आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :मुंबईनदीमुंबई महानगरपालिका