मतदार दाखविणार का मुंबई स्पिरिट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 04:37 IST2019-04-29T04:36:50+5:302019-04-29T04:37:07+5:30

चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील १७ जागांवर मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असली, तरी मतदानाचा टक्का राखला जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे

Will the voters show Mumbai Spirit? | मतदार दाखविणार का मुंबई स्पिरिट?

मतदार दाखविणार का मुंबई स्पिरिट?

गौरीशंकर घाळे 

मुंबई : चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील १७ जागांवर मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असली, तरी मतदानाचा टक्का राखला जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सलग सुट्ट्या, लगीनसराई आणि उन्हाच्या झळा यामुळे मतदानाचा टक्का घसरणार की, मुंबई स्पिरिट दाखवत नागरिक मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणार, हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.

चौथा शनिवार, रविवारमुळे बहुतांश लोकांना दोन दिवस सुट्टी आहे. त्यात सोमवारच्या मतदानाच्या सुट्टीची भर पडणार आहे. तीन दिवस सुट्टी मिळाल्यास बाहेरगावी जाण्याचा, सहलीचे बेत आखले जातात. मतदानादिवशी लग्न मुहूर्त असल्याने त्याचाही परिणाम मतदानावर होईल, अशी भीती प्रशासनला आहे. त्यामुळेच आधी मतदान, मग सुट्टी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत देशभरात मतदानाचा टक्का वाढला. मुंबईत नवमतदारांनी भरभरून मतदान केले. मुंबईतील मतदानाचा टक्का चाळीशीच्या आसपासच राहतो. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही चांगले मतदान व्हावे, यासाठी प्रशासन, राजकीय पक्ष, उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने मतदार जागृतीसाठी फ्लॅश मॉब, नवमतदारांसाठी माय फर्स्ट वोट सेल्फी आदी उपक्रम राबविले. थेट आयपीएल सामन्यांदरम्यान जाहिरातबाजी केली. दिव्यांग मतदारांसाठी ‘घर ते मतदान केंद्र आणि परत घर’ अशी सुविधा आहे, तर मुंबई शहरातील दहा मतदान केंद्रांचा ताबा केवळ महिला अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.

मागील निवडणुकांत असे झाले होते मतदान
गेल्या निवडणुकीत ५१.६८ टक्के मुंबईकरांनी मताधिकाराचा वापर केला. २००९च्या तुलनेत मतदानातील ही वाढ १०.२८ टक्के होती. त्यापूर्वी सहा लोकसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी पाहता, २०१४ सालची मतदानाची टक्केवारी रेकॉर्डब्रेक होती. १९९८च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रथमच मुंबईकरांच्या मतदानाची टक्केवारीने पन्नाशी टप्पा ओलांडला होता. २००९ साली साधारण ४१.४० टक्के मुंबईकरांनी मतदान केले होते, तर २००४च्या निवडणुकीत ४७.३० टक्के, १९९९ साली ४५ टक्के, १९९८ साली ५०.४० टक्के, १९९६ साली ४५.१० टक्के, तर १९९१ साली ४१.६० टक्के मतदानाची नोंद झाली होती.

Web Title: Will the voters show Mumbai Spirit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.