पावसाळ्यात पार्ल्याची तुंबापुरी होणार?
By मनोहर कुंभेजकर | Updated: May 22, 2025 14:51 IST2025-05-22T14:51:22+5:302025-05-22T14:51:31+5:30
विलेपार्ले येथील कदम चाळ परिसरात चेंबर्सची साफसफाई योग्य प्रकारे झालेली नाही.

पावसाळ्यात पार्ल्याची तुंबापुरी होणार?
मुंबई : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सुरू झाल्या असताना विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात मात्र ठिकठिकाणी नालेसफाई झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आढळले. रस्त्यालगतच्या गटारांतील गाळ काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याची पार्लेकरांचीही तक्रार आहे. त्यामुळे नालेसफाईचे महापालिकेचे दावे फोल ठरत आहेत. पावसाळ्यात पार्ल्याची तुंबापुरी होणार का, अशी भीती पार्लेकर व्यक्त करत केली.
विलेपार्ले येथील कदम चाळ परिसरात चेंबर्सची साफसफाई योग्य प्रकारे झालेली नाही. ब्लाॅसम इमारतीच्या विकासकाने येथील पर्जन्यवाहिन्या गायब केल्या असून, के- पूर्व विभागाचे परीरक्षण विभागाचे सहायक अभियंता भूपेश राणे यांनी १२ एप्रिलला कल्पवृक्ष इमारतीच्या बाजूने वेगळी वाहिनी टाकून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता झालेली नाही. येथील पाटील वाडी, इस्माईल चाळ व नाना-नानी पार्क शेजारचा नाला स्वच्छ झालेला साफ केला नाही.
येथे पाडकाम केलेल्या एका घराचा राडारोडा गटारात पडत आहे. चाळीतील आतली गटारे दत्तक वस्तीच्या कामगारांकडून साफ करून घेतली आहे; मात्र मोठी गटारे अजून स्वच्छ झालेली नाहीत. आमच्या सोसायटीतून गेलेला श्रद्धानंद रोड नाल्याची सफाई झाली नाही, अशी तक्रार रहिवाशांनी केली.
सफाई कर्मचारी फक्त फोटो काढून निघून गेले
नवीन भाई ठक्कर क्रॉस रोड नंबर ४ जेथे काव्या व शिवनेरी सोसायटी आहे. तेथील गल्लीतील नाल्याची सफाई झालेली नाही.
इमारतीला वळसा घेऊन मंगल प्रभा सोसायटीच्या कंपाउंडमधून जाणाऱ्या नाल्याचीसुद्धा सफाई झालेली नाही.
दोन दिवसांपूर्वी दोन वेळा तेथे नालेसफाईसाठी कर्मचारी आले होते. थोडा वेळ थांबले होते. ते फोटो काढून तिथून निघून गेले, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष शैलेश कपाडिया यांनी दिली.
तुंबापुरीतून सुटका करण्याची मागणी
रस्त्यालगतच्या गटारांतील गाळ काढण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्वतः लक्ष घालून पार्लेकरांची ‘तुंबापुरी’पासून सुटका करण्याची मागणी होत आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी
स्थानिक आमदार ॲड. पराग अळवणी यांनी सांगितले की, आपण खूप मेहनत करून श्रद्धानंद रोड येथे नवीन नाला बांधला होता. त्यामुळे मिलन सब-वे परिसरासह पार्ल्यात कुठेही पाणी साठत नव्हते.
मात्र यावेळी रस्त्यालगतच्या गटारातील गाळ काढण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. पावसाने काही वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे. आपण स्वतः व स्थानिक नागरिकांनी याबाबत के-पूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत.