बीकेसीत वाहतूक कोंडी शुल्क लागणार? ५० मिनिटांपेक्षा कमी वेळ थांबल्यास आर्थिक भुर्दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 02:33 IST2025-05-12T02:32:26+5:302025-05-12T02:33:19+5:30
बीकेसीत दरदिवशी २ लाख कर्मचारी, तर ४ लाख अभ्यागत येतात. तसेच अनेक वाहने बीकेसी कनेक्टर आणि अन्य रस्त्यांचा वापर करून पूर्व किंवा पश्चिम उपनगरात ये-जा करतात.

बीकेसीत वाहतूक कोंडी शुल्क लागणार? ५० मिनिटांपेक्षा कमी वेळ थांबल्यास आर्थिक भुर्दंड
अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बीकेसीतील अंतर्गत रस्त्यांचा केवळ पूर्व किंवा पश्चिम उपनगरात जाण्यासाठी वापर करणाऱ्या वाहनांना लवकरच वाहतूक कोंडी शुल्काचा भुर्दंड बसणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गर्दीच्या वेळी या भागात युरोप आणि सिंगापूरच्या धर्तीवर हे शुल्क लागू करण्याच्या हालचाली एमएमआरडीएने सुरू केल्या आहेत.
या धोरणानुसार ५० मिनिटांहून कमी कालावधीसाठी बीकेसीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाला शुल्क भरावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले. बीकेसीत दरदिवशी २ लाख कर्मचारी, तर ४ लाख अभ्यागत येतात. तसेच अनेक वाहने बीकेसी कनेक्टर आणि अन्य रस्त्यांचा वापर करून पूर्व किंवा पश्चिम उपनगरात ये-जा करतात. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी एमएमआरडीएने वाहतूक कोंडी शुल्काचा पर्याय आणला आहे. त्याचवेळी बीकेसीत नियमित येणाऱ्या वाहनांना मात्र यातून सूट देण्याचा विचार आहे. त्यासाठी अशा वाहनांची नोंदणी केली जाणार आहे. त्याचे सविस्तर धोरण बनविण्यासाठी एमएमआरडीए लवकरच सल्लागार नेमणार असून, त्यामार्फत सुसाध्यता तपासून शुल्क निश्चित करण्यात येणार आहे.
त्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाईल. एमएमआरडीएच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.