Join us
Daily Top 2Weekly Top 5

 मराठी मतांचे विभाजन होणार का?; अरविंद सावंत अन् रामदास कदमांची टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 09:55 IST

मुंबईतील अनेक महत्त्वाची केंद्रे गुजरातला हलवली. याचा राग इथे राहणाऱ्या गुजराती माणसाला यायला हवा असं शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी म्हटलं.

अरविंद सावंत, खासदार, शिवसेनाशिवसेना नेते मुळात शिवसेनेबरोबर मराठी माणसे आहेतच पण मराठी माणसाला निश्चितच हंस क्षीर न्याय कळतो. दूधही कळतं आणि पाणीही कळतं. त्यामुळे मराठी माणूस कुठे राहणार हे स्पष्ट आहे. कारण हंस क्षीर न्यायाने त्याला सत्य काय आहे ते माहीत आहे. उद्धव ठाकरे यांचा ज्या पद्धतीने अवमान झाला आहे तो मराठी माणूस विसरणार नाही पण फक्त मराठी माणूसच का? १०६ हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळाली. याचा राग मुंबई महाराष्ट्राला मिळू नये असं वाटणाऱ्यांच्या मनात तेव्हापासून आहे. त्यामुळे जागतिक वित्तीय केंद्र गुजरातला नेले. आता म्हणतात मुंबईत आणणार, मग आधी का जाऊ दिले.

मुंबईतील अनेक महत्त्वाची केंद्रे गुजरातला हलवली. याचा राग इथे राहणाऱ्या गुजराती माणसाला यायला हवा. मी म्हणतो, गुजराती माणूस, राजस्थानी माणूस कुठे जाईल, हा प्रश्न कधी विचारला जात नाही. त्या समाजाचा काय कुठल्या पक्षाने ठेका घेतला आहे का? ते सगळे आमच्यासोबत आहेत. त्यांना माहीत आहे शिवसेना मुंबईत नसेल तर काय होईल? हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते आमच्याबरोबर आहेत. मुंबई सोडा ठाण्यात तरी मराठी माणूस त्यांच्याबरोबर आहे का? शिवसेना सोडून गेलेल्यांसाठी गद्दार शब्द किती चांगला आहे, किती कृतघ्न असतात ही माणसं. 

रामदास कदम, शिंदे गट मुंबईत २५ वर्षांच्या आधी ४० टक्के मराठी माणूस होता आणि ६० टक्के इतर भाषक लोक होते. मागील २५ वर्षे मुंबई महापालिका उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे आणि तिथे आता केवळ १३ टक्के मराठी शिल्लक आहेत. मग मागील २५ वर्षे मराठी माणूस मुंबईबाहेर जाऊ नये म्हणून आपण काय प्रयत्न केले? आम्ही मराठी माणूस का थांबवू शकलो नाही. परप्रांतीय लोंढा वाढू नये यासाठी आम्ही काय केले, याचे उत्तर नेमके कोण देणार? शिंदे गट, उद्धव गट यांच्यात मराठी मतांची विभागणी होईल असे आपण म्हणतो पण मराठी माणूस शिल्लकच कुठे राहिला आहे? तो नामशेष कुणी केला? का केला? याची उत्तरे द्यावी लागतील. एकीकडे सर्वधर्मसमभावाची भूमिका घ्यायची, काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर घरोबा करायचा आणि मराठी माणसाचेही नाव घ्यायचे, हे दुटप्पी नाही का? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेचा जन्म झाला. मग त्या मराठी माणसाचे तुम्ही काय केले? परप्रांतीयांचा पुरस्कार करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत तुम्ही जाऊन बसलात. आता मराठी माणसाबद्दल तुम्ही कसे काय बोलू शकता? एकवेळचा दादर, गिरगाव, परळ हा मराठी बालेकिल्ला आता साफ झाला. मराठी माणूस केवळ निवडणुकीपुरता नको, नंतरही त्याचा विचार करणार का? आशिष शेलार, अजित पवार, भाई जगताप यांच्याबरोबर मराठी माणसे नाहीत का?

टॅग्स :शिवसेनारामदास कदमअरविंद सावंत