दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?

By अतुल कुलकर्णी | Updated: June 29, 2025 06:05 IST2025-06-29T06:04:55+5:302025-06-29T06:05:45+5:30

मातृभाषा व प्रादेशिक भाषेला उत्तेजन व महत्त्व दिले पाहिजे, असे राष्ट्रीय भाषा धोरणात सांगितले आहे.

Will the two Thackerays come together or will the decision change? | दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?

दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?

अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई

कार्यकर्त्यांनो,

नमस्कार.

तुमच्यात उत्साह संचारला आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार म्हणून तुम्ही जोमाने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहात. ठाकरे बंधुंचे प्रेम पाहून तुम्ही आपापसांतील मतभेद विसरून गेला आहात. मराठी माणूस नेहमी युद्धात जिंकतो, तहात हरतो हा इतिहास आहे. उत्साहाने ५ तारखेची तयारी करताना हा इतिहास लक्षात ठेवा. आपण सूज्ञ आहात. ठाकरे बंधुंचे सूर जुळले आहेत. जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, असे उद्धव ठाकरे सांगत आहेत. राज ठाकरे देखील महाराष्ट्राच्या हितासाठी बाकी सगळे वाद छोटे असल्याचे सांगतात. मात्र, हे सगळे येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांसाठी सुरू आहेत, असा आक्षेप भाजपकडून घेतला जात आहे. या सगळ्यांत इथे दिलेल्या काही प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधली पाहिजेत.

मातृभाषा व प्रादेशिक भाषेला उत्तेजन व महत्त्व दिले पाहिजे, असे राष्ट्रीय भाषा धोरणात सांगितले आहे. आपली मातृभाषा हिंदी आहे म्हणून आपण तिला उत्तेजन देण्यासाठी एवढे  उत्तेजित झालो आहोत का? हा पहिला प्रश्न. हिंदी भाषा शक्तीने शिकवा, असे कुठेही धोरणात नमूद नाही. मग दक्षिणेकडची राज्य हिंदी भाषा शिकवत आहेत का? हा दुसरा प्रश्न. राष्ट्रीय धोरणात तीन भाषा शिकल्या पाहिजेत, असा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. त्या धोरणात असे कुठे लिहिलेले आहे का..? राज ठाकरे सांगतात, असे कुठेही लिहिलेले नाही. जे कोणी हिंदी सक्तीच्या विरोधात आहेत त्यांनी हे धोरण पाहिले आहे का? धोरणात असा उल्लेख आहे का? जर उल्लेख नसेल तर ही गोष्ट ठळकपणे समोर का आणली जात नाही? उल्लेख असेल तर भाजप नेते तो का दाखवत नाहीत?

हिंदीची सक्ती केलेली नाही, असे शिक्षणमंत्री दादा भुसे सांगतात; मात्र २० विद्यार्थी एकत्र आले व त्यांनी हिंदी शिकायची ठरवली तर त्यांना ती शिकवली जाईल असा आदेश ते का काढतात? म्हणजे एखाद्या शाळेतल्या १० वर्गांमध्ये प्रत्येकी १०० मुलं असतील आणि त्यातील प्रत्येकी २० मुलांनी हिंदी शिकण्याचा आग्रह धरला, तर ती भाषा त्यांना शिकवावी लागेल. मग हिंदीची सक्ती नाही, असे म्हणता येईल का? चोरपावलाने का होईना हिंदी भाषा लहान वयातच मराठीच्या हातात हात घालून घरात येईल. (जशी शिवसेनेचा हात धरून भाजप महाराष्ट्रात वाढली...)

मूल ज्या घरात जन्माला येते, त्या घराची भाषा त्याची बोलीभाषा होते. त्याची विचार करण्याची पद्धत त्याच भाषेत तयार होते. अशी मुलं जर हिंदी शिकू लागली, तर भविष्यात ती मराठी वाचतील का? २३०० वर्षे जुनी भाषा म्हणून मराठीचा उल्लेख आहे. या भाषेवर लहान वयातच असे अतिक्रमण झाले, तर ही भाषाच संपून जाईल, ही भीती अनाठाई आहे की नाही? असे प्रश्न तुम्ही तुमच्या नेत्यांना विचारले पाहिजेत. कोणीतरी चला म्हणतो आणि तुम्ही त्याच्या मागे जाता. त्याआधी या गोष्टीचा विचार तुमच्या मनात आला पाहिजे, असे तुम्हाला वाटत नाही का?

हिंदी भाषेची सक्ती ही निवडणूक जिंकण्याच्या आसक्तीतून आली आहे का? हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा. त्यानंतरच अमुक-तमुक जिंदाबादच्या घोषणा द्या. ५ तारखेला होणाऱ्या मोर्चाआधीच जर सरकारने यू-टर्न घेतला आणि पहिली ते चौथी हिंदीची कसलीही सक्ती राहणार नाही, अशी भूमिका घेतली, तर दोन भावांच्या मोर्चाचे काय होईल? तो विजयी सभेत रूपांतरित होईल की त्याची हवाच निघून जाईल? मराठीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकारणाचा लाभ दोन ठाकरेंना होईल. मराठी मतं एकगठ्ठा एका बाजूला जातील, असा जर कोणी जावईशोध लावत असेल, तर भाजप, काँग्रेस, दोन राष्ट्रवादी, शिंदेसेना यांच्याकडे असणाऱ्या मराठी लोकांना कोणाची मते मिळतील? याचा अर्थ मराठी मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होईल का? त्यावेळी उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतदान भाजपला एकगठ्ठा मिळाले तर काय होईल? नुसत्या मराठी मतांवर मुंबई महापालिका काबीज करावी, अशी आज मुंबईची अवस्था आहे का? शांतपणे या प्रश्नांची उत्तरे शोधा. जिंदाबाद, मुर्दाबादच्या घोषणा देण्याआधी या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर तुम्हाला नेमके काय करायचे, हे सांगायला कोणाची गरज उरणार नाही... तेव्हा वेळ वाया घालवू नका. इथे दिलेल्या प्रश्नांसह आणखी नवनवे प्रश्न काढा... त्यांची उत्तरे शोधा... तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा..!

- तुमचाच बाबूराव

Web Title: Will the two Thackerays come together or will the decision change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.