रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 07:59 IST2025-11-14T07:42:39+5:302025-11-14T07:59:25+5:30
Central Railway N बाह्य यंत्रणांकडून रेल्वे कर्मचाऱ्यांवर आरोप लावून त्यांना त्रास दिला जात आहे. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना विनाकारण अडकवले जात आहे. त्यामुळे आमची ओळख टिकवून ठेवण्यासाठी ‘वर्क टू रूल’ अर्थात ड्युटी आहे तेवढेच काम करून अतिरिक्त काम न करण्याचा इशारा देणारे फलक रेल्वे कर्मचारी संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) लावले आहेत

रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
मुंबई : बाह्य यंत्रणांकडून रेल्वे कर्मचाऱ्यांवर आरोप लावून त्यांना त्रास दिला जात आहे. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना विनाकारण अडकवले जात आहे. त्यामुळे आमची ओळख टिकवून ठेवण्यासाठी ‘वर्क टू रूल’ अर्थात ड्युटी आहे तेवढेच काम करून अतिरिक्त काम न करण्याचा इशारा देणारे फलक रेल्वे कर्मचारी संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) लावले आहेत.
व्हीजेटीआय अहवालावरून मुंब्रा दुर्घटनेबद्दल दोन रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हा गुन्हा चुकीचा असून, तो रद्द करावा, अशी मागणी करत सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने ६ नोव्हेंबर रोजी सीएसएमटी स्थानकावर मोटरमन लॉबीसमोर ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन केले. परिणामी, तासभर लोकल सेवा बंद झाली.
यामध्ये दोषी ठरवून सीआरएमएसच्या दोन पदाधिकाऱ्यांवर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यावर सीआरएमएसने आक्रमक पवित्रा घेत रेल्वे प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पुन्हा लोकल वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते जर कर्मचाऱ्यांनी ‘वर्क टू रूल’ केले तर याचा परिणाम मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवांवर होऊ शकतो.
काय आहे फलकावर?
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात बाह्य संस्थेद्वारे रेल्वे कर्मचाऱ्यांवर आरोप लावून त्यांना त्रास दिला जात आहे. यामुळे त्यांच्या मनोबलावर वाईट परिणाम होत आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाचे ऐकावे की बाहेरील संस्थेचे असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
विनाकारण रेल्वे कर्मचाऱ्यांना अडकवण्यात येत आहे. आम्हाला आमची ओळख टिकवून ठेवण्यासाठी ‘वर्क टू रुल’ करण्यास भाग पाडू नये.
‘त्यांच्या’ अहवालावर विश्वास
आमच्या शांततापूर्ण विरोधाला ‘क्रिमिनल प्रोटेस्ट’ केले आहे. व्हीजेटीआयच्या रिपोर्टच्या आधारे आमच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेत, याचा निषेध आहे. त्यांच्या रिपोर्टवर सर्व विश्वास ठेवत आहेत, परंतु रेल्वेच्या नाही, हे दुर्दैवी आहे.
- विवेक शिसोदिया, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ