Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: महायुती सरकारने जाहीर केल्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेचा विषय ठरली आहे. ही योजना लागू केल्यापासून विरोधकांनी सातत्याने याबाबत टीका केली असून, विविध प्रकारचे दावे आताही केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमुळे अनेक योजना, अनुदान बंद करण्यात आल्याचा आरोप महायुती सरकारवर केला जात आहे. लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याचा दावाही केला जात आहे. तसेच लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची संख्या १० लाखांवर जाऊ शकते, असा दावा केला जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी महत्त्वाची ठरली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुती सरकारने जुलै २०२४ पासून ही योजना लागू करत असल्याची घोषणा केली. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या विजयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली आहे. एकीकडे या योजनेला बळकटी मिळावी, यासाठी महायुती सरकारकडून पाठबळ दिले जात असतानाच दुसरीकडे छाननी सुरू करून निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्याची सुरुवात करण्यात आली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, लाडकी बहीण योजना नको असे म्हणणाऱ्यांची संख्या आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र महिलांची संख्या १० लाखांवर जाणार?
राज्य सरकारने गेल्या वर्षी जुलैमध्ये लागू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील निकषांचे उल्लंघन करणाऱ्या पाच लाख बहिणींना महिला विकास विभागाने अपात्र ठरविले आहे. ही संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. चारचाकी ‘कारवाल्या’ लाडक्या बहिणींची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात असून, आर्थिकदृष्टया सधन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अपात्र बहिणींची संख्या जास्त ठरणार आहे. योजनेतील बहिणींच्या अर्जाच्या छाननीने स्थानिक पातळीवर वेग घेतला आहे. सरकारमधील अनेक मंत्र्यांचे आवाहन आणि शासकीय कारवाईच्या भीतीने आतापर्यंत दीड लाख लाडक्या बहीणींनी ‘योजना नको’ म्हणून अर्ज केले आहेत. ही संख्या राज्यात दहा लाखापर्यंत जाण्याची शक्यता काही अधिकारी व्यक्त करीत असल्याचे म्हटले जात आहे.
समोर आलेली ही संख्या पुणे व आजूबाजूच्या जिल्ह्यातील
छाननी न करता दाखल करण्यात आलेल्या अर्जात वयोमर्यादा पार केलेल्या किंवा २१ वयापेक्षा कमी असलेल्या एक लाख दहा हजार अपात्र लाडक्या बहिणी आहेत. ही सरासरी महिन्याला एक लाख राहण्याची शक्यता आहे. समोर आलेली ही संख्या पुणे व आजूबाजूच्या जिल्ह्यातील आहे. वाहन असलेल्या ‘कारवाल्या’ लाडक्या बहिणींची संख्या एक लाख ६० हजार असून ही संख्या केवळ पश्चिम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या कुटुंबाची आहे. अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींची अद्याप छाननी सुरू झालेली नाही, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थींची यादी महिला विकास विभागाला तात्काळ मिळाल्याने या योजनेचा लाभ घेतलेल्या दोन लाख ३० हजार बहिणींना अपात्र ठरवण्यात आले. शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ९४ लाखाच्या घरात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातील बहिणींनी यापुढे योजनेतील लाभ स्वीकारण्यास नकार दिला आहे. मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागातील छाननीची ही संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. प्राप्तिकर विभागाकडून माहिती आल्यानंतर ही छाननी अधिक तीव्र होणार असून ही गळती लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.