पूर्व उपनगरांत गणित बिघडणार?, उद्धवसेना आणि मनसेच्या संभाव्य आघाडीचा महायुतीला मोठा फटका बसण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 11:52 IST2025-12-20T11:52:07+5:302025-12-20T11:52:35+5:30
मुंबईतील पूर्व उपनगरांत आमदार, माजी नगरसेवक व सर्व भाषिक मतदारांचे गणित लक्षात घेता भाजप व शिंदेसेनेचे प्राबल्य स्पष्टपणे दिसून येत आहे.

पूर्व उपनगरांत गणित बिघडणार?, उद्धवसेना आणि मनसेच्या संभाव्य आघाडीचा महायुतीला मोठा फटका बसण्याची चिन्हे
महेश पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील पूर्व उपनगरांत आमदार, माजी नगरसेवक व सर्व भाषिक मतदारांचे गणित लक्षात घेता भाजप व शिंदेसेनेचे प्राबल्य स्पष्टपणे दिसून येत आहे. शहरी व मध्यमवर्गीय भागात भाजप मजबूत आहे, तसेच शिंदेसेनेने विविध पक्षांतील नगरसेवकांना जोडत आपला प्रभाव वाढवला आहे. उद्धवसेना काही टिकून उद्धवसेना आणि मनसेच्या संभाव्य आघाडीमुळे महायुतीची गणिते बिघडण्याची शक्यता आहे.
पूर्व उपनगरातील ११ विधानसभांपैकी महायुतीकडे ८ आमदार आहेत. भाजपने मुलुंड, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम हे बालेकिल्ले कायम राखले आहेत. तर शिंदेसेनेचे भांडुप, चेंबूर, कुर्ला, चांदिवली त अणुशक्ती नगरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असल्याने महायुती येथे प्रबळ आहे. तर कलिना व विक्रोळी येथे उद्धवसेना व मानखुर्दमध्ये समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. महापालिका निवडणुकीत महायुतीला आव्हान देण्यासाठी मराठी व मुस्लिम मतदारांचे प्रभावी एकत्रीकरण करणे यासाठी उद्धवसेनेची कसोटी लागणार आहे.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत ६९ पैकी २४ प्रभागांत विजय मिळवून पूर्व उपनगरात एकसंघ शिवसेनेने दबदबा ठेवला. मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला त्यांना भेदता आला नाही. येथील सहापैकी पाच मराठीबहुल प्रभागांत भाजपचेच उमेदवार निवडून आले होते. भाजपचे पूर्व उपनगरातील संख्याबळ १९ वर पोहोचले होते. तर काँग्रेस (७), राष्ट्रवादी (६), मनसे (५), सपा (५), अपक्ष (२), एमआयएम (१) असे उमेदवार निवडून आले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर येथील चित्र बदलले असून, शिंदेसेनेचे पूर्व उपनगरात प्राबल्य वाढले आहे.
किती प्रभागांत, भाषिकांचे प्राबल्य
मराठी - ४६
मुस्लिम - १७
गुजराती - ०५
उत्तर भारतीय - ०१
सत्तांतरानंतरचे बदललेले चित्र
आताची स्थिती पक्षनिहाय नगरसेवक
शिंदेसेना २४
उद्धवसेना १४
भाजप १९
काँग्रेस ०५
राष्ट्रवादी ०४
सपा ०३
मनसे ००
एकूण नगरसेवक ६९
चार विधानसभेत उद्धवसेनेची पाटी कोरी
भांडुपमध्ये शिंदेसेनेचे आमदार असले तरी येथील १ माजी नगरसेवक वगळता ३ माजी नगरसेवक उद्धवसेनेतच आहेत.
विक्रोळीत उद्धवसेनेचे आमदार असूनही येथील चारही माजी नगरसेवक शिंदेसेनेत गेले आहेत. घाटकोपर, अणुशक्तीनगर मतदारसंघातील उद्धवसेनेच्या सर्व माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.
सद्यस्थितीत शिंदेसेनेने मनसे, सपा, एमआयएम व अपक्ष माजी नगरसेवकांना पक्षात आणून २४ माजी नगरसेवकांसह पूर्व उपनगरात विस्तार करत विरोधकांसमोर आव्हान उभे केले आहे.
भाषिक मतदारांचे गणित असे...
पूर्व उपनगरातील ६९ प्रभागांपैकी मराठी मतदारांचे ४६ प्रभाग, मुस्लिम १७, गुजराती ५ आणि उत्तर भारतीय १ असे प्रभाग आहेत. मराठी मतदार बहुसंख्य असूनही ते एकसंघ नाहीत. त्याचा फायदा शिंदेसेना व भाजपला मिळाल्याचे चित्र असले तरी मनसे सोबत आल्यास उद्धवसेना दबदबा निर्माण करेल का, याची उत्सुकता आहे.