कुर्ला, भांडूप बस अपघाताचा मुद्दा प्रचारात घेणार का? राजकीय पक्ष आणि भावी नगरसेवकांना मुंबईकरांचा खडा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:14 IST2026-01-01T13:13:00+5:302026-01-01T13:14:17+5:30
मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या लालबहादूर शास्त्री मार्गावर सायनपासून कुर्ला डेपोपर्यंतच्या मार्गावरील दोन्ही बाजूंकडील फुटपाथवर भंगारवाल्यांसह गॅरेजचालकांनी अतिक्रमण केले आहे. तसेच हातगाड्या लावणे, वेल्डिंग करणे, चारचाकी आणि दुचाकी वाहनांची अनेक कामे फुटपाथवरच केली जात आहेत.

कुर्ला, भांडूप बस अपघाताचा मुद्दा प्रचारात घेणार का? राजकीय पक्ष आणि भावी नगरसेवकांना मुंबईकरांचा खडा सवाल
मुंबई : कुर्ला आणि भांडूप येथील बेस्ट बस अपघातात चारजणांचा बळी गेल्यानंतर फेरीवाल्यांनी फुटपाथचा ताबा घेतल्याचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला आहे. दक्षिण मुंबईपासून मध्य मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील बहुतांशी फुटपाथ फेरीवाले, भंगारवाल्यांसह अनधिकृत पार्किंगने व्यापले आहेत. कुर्ला आणि भांडूप येथील बस अपघातानंतर महापालिका याकडे गंभीरपणे पाहणार आहे का? महापालिका निवडणुकीत तरी हा मुद्दा राजकीय पक्ष आणि भावी नगरसेवक प्रचारात घेणार का, असा सवाल मुंबईकरांनी केला आहे.
मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या लालबहादूर शास्त्री मार्गावर सायनपासून कुर्ला डेपोपर्यंतच्या मार्गावरील दोन्ही बाजूंकडील फुटपाथवर भंगारवाल्यांसह गॅरेजचालकांनी अतिक्रमण केले आहे. तसेच हातगाड्या लावणे, वेल्डिंग करणे, चारचाकी आणि दुचाकी वाहनांची अनेक कामे फुटपाथवरच केली जात आहेत.
फेरीवाले, बस स्टॉपवरील रांगेमुळे अपघात स्थिती
कुर्ला रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला तिकीट घरासह गणपती मंदिरापासून बेस्ट बसस्थानकापर्यंत, घाटकोपर पश्चिमेला बस आणि रिक्षा स्टॅण्डलगतचा रस्ता आणि सांताक्रूझ पूर्वेकडील स्टेशन रोडच्या दोन्ही बाजूंकडील फुटपाथही फेरीवाल्यांनी व्यापलेले असतात.
वांद्रे पूर्वेकडील फुटपाथ चालण्यास धड नाहीत. दादरच्या फुलमार्केटमध्येही विदारक स्थिती आहे. मुलुंड रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूसही फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे स्थिती गंभीर आहे. कुर्ल्यातील बस अपघातानंतरही तेथील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. फेरीवाल्यांची गर्दी, रिक्षा आणि बस स्टॅण्डवरील प्रवाशांची रांग यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
येथे व्यापले फुटपाथ
मालाड पश्चिम : मालाड स्टेशन रोड, एन. एल. कॉलेजसमोर, एस. व्ही. रोड, चोक्सी हॉस्पिटल, मार्वे रोड, माइंड स्पेस-लिंक रोड आणि आयसीआयसीआय बँकेपासून नेव्ही नगरपर्यंत, लिबर्टी गार्डन विभाग.
मालाड पूर्व : रश्मी डेअरीसमोर - मालाड स्टेशनजवळ, ओबेरॉय मॉल, फिल्म सिटी रोड, पुष्पा पार्क, दप्तरी रोड.
कांदिवली पश्चिम : स्टेशनरोड, चारकोप सेक्टर ३ व ४, मथुरादास रोड, डहाणूकर वाडी सिग्नलजवळ, महावीरनगर.
कांदिवली पूर्व : आकुर्लीरोड, लोखंडवाला सर्कल, ठाकूर व्हिलेज, ठाकूर कॉलेज जवळ, पोईसर विभाग
बोरिवली : डी मार्ट, चंदावरकर रोड, प्रबोधन नाट्यमंदिराजवळ, योगीनगर रोड, कार्टर रोड क्रमांक ३ अशा विविध ठिकाणी फुटपाथ फेरीवाल्यांनी अक्षरशः व्यापले आहे.