Join us

सरप्लसमुळे शिक्षक मायनस होणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 21:37 IST

खरंच साधारण एक दहा वर्षांपूर्वी शिक्षक बऱ्यापैकी निवांत होते. विद्यादान करायचे, दिवाळीची आणि उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय (परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासत!) करायची असा दिनक्रम होता.

सीमा महांगडे

मुंबई - बऱ्याच दिवसांनी माझ्या शाळेतल्या शिक्षिका मला दिसल्या, भेटून खूप आनंद झाला. खुशाली ही विचारली, तेव्हा हसल्या मात्र त्यात समाधान दिसले नाही. सरप्लसची टांगती तलवार मानेवर असल्याचं हसत हसतच सांगितले. आता मुंबईत तर जागा नाही तेव्हा कोणत्या ठिकाणी , कोणत्या जिल्ह्यात बदली होणार याचीही कल्पना नसल्याचं चित्र चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. माझ्या शाळेतून बदली झाल्यावर आता ही त्यांची दुसरी बदली असणार आहे त्यामुळे साहजिकच ताण मनावर असला तरी नोकरी कायम असणार असल्याने आपले जग बदली होईल तिथे फिरवायचे अशी तयारी केली होती.

खरंच साधारण एक दहा वर्षांपूर्वी शिक्षक बऱ्यापैकी निवांत होते. विद्यादान करायचे, दिवाळीची आणि उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय (परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासत!) करायची असा दिनक्रम होता. एकूण सर्व काही आलबेल होतं, पण नंतर हे चित्र बदलत गेले. अभ्यासक्रम बदलला, परीक्षा पद्धतीत काही बदल झाले, कामाचा व्याप वाढला, शैक्षणिक कामाव्यतिरिक्त जनगणनेसारखी अशैक्षणिक कामाची झोंबडी मागं लागली. पण या सर्व व्यापात नोकरीची मात्र चिंता नव्हती. त्यामुळे नोकरी सलामत तो पगडी पचास अशी निश्चिंती होती. मात्र नव्या आकृतिबंधानुसार विद्यार्थी पटसंख्या तसे शिक्षक यामधून 'सरप्लस' हा नवा शब्द शिक्षकांच्या आयुष्यात आला आणि अनिश्चिततेची टांगती तलवार शिक्षकांच्या विशेषतः मराठी शिक्षकांच्या डोक्यावर आली. एखाद्या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली तर एखाद्या शिक्षकाच्या नोकरीवर गदा आली म्हणून समजा असा प्रकार सुरू झाला. त्यामुळे 'सरप्लस' या शब्दाचा धसका शिक्षकांनी घेतला आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या थेट शिक्षकाच्या नोकरीवर अशा तऱ्हेने परिणाम करू लागली आहे. मराठी शाळा बंद पडू लागल्या, या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली तर सरप्लस शिक्षकांचे प्रमाण वाढणार आहे. मराठी शाळा बंद पडण्याचे मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही माध्यमे असणाऱ्या शाळांमध्ये हा प्रकार जास्त आहे. शेजारचा मुलगा त्याच शाळेत इंग्रजी माध्यमात शिकतो आणि आपला मुलगा मात्र मराठी माध्यमात; या न्यूनगंडामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलाला प्रवेश घेण्यावर भर दिला जाऊ लागला आहे. साहजिकच मराठी माध्यमाच्या शाळेत सरप्लस शिक्षकांचा प्रश्न भविष्यात गहन होऊ होऊ लागला आहे. त्यामुळे आता शिक्षक सरप्लस नाही, प्लस नाही थेट नोकरीतून मायनस होईल की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :मुंबईशिक्षक