मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार-मंत्री नितेश राणे
By मनोहर कुंभेजकर | Updated: January 5, 2025 20:44 IST2025-01-05T20:43:48+5:302025-01-05T20:44:35+5:30
मुंबई :- येणाऱ्या काळात मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती ...

मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार-मंत्री नितेश राणे
मुंबई:- येणाऱ्या काळात मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्ट मंडळाला दिले.
ताडदेव बेलासिस ब्रीज येथील ब्रीज च्या बांधकामांमुळे बाधित होणाऱ्या मासळी विक्रेत्या कोळी महिलांचे ताडदेव मध्येच योग्य पुनर्वसन करा, पालघर जिल्ह्यातील एमआयडीसी मुळे खाड्या मृत झालेल्या खाड्या पुनर्जीवित करा, कोळीवाड्यातील राहत्या घराखालच्या जमिनी मच्छिमारांच्या नावे करा, मुंबईतील मासळी मार्केट मधील समस्या सोडवा, पावसाळी अवैध मासेमारी वर आळा घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची समन्वय समिती गठीत करा, अवैध पर्ससीन नेट आणि एल .ई.डी लाईट मासेमारीवर आळा घाला, मच्छिमारांची कर्ज माफी करा, वाढवण बंदर कायमचे रद्द करा आदी प्रश्नांकडे मंत्री नितेश राणेंचे समितीने लक्ष वेधले.मंत्री नितेश राणें यांनी मच्छिमारांच्या व्यथा समजून घेतल्या आणि त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल, महिला अध्यक्षा नयना पाटील, मुंबई जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल भोईर, पालघर जिल्हाध्यक्ष विनोद पाटील, सचिव जयेश तांडेल, मच्छिमार नेते रवींद्र पांचाळ आदी उपस्थित होते.
राज्याच्या इतिहासात दुसऱ्यांदा मासेमारी व्यवसायाशी नाळ असणाऱ्या कोकणातील लोकप्रतिनिधीला मत्सव्यवसाय मंत्रिपद मिळाल्यामुळे सातही सागरी जिल्ह्यातील मच्छिमारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.युती सरकार मध्ये सन १९९५ साली नारायण राणे यांनी मत्स्यव्यवसाय मंत्रिपद भूषविले होते.त्यामुळे वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून मच्छिमार समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य मंत्री नितेश राणेंकडून अपेक्षित असल्याच्या भावना तांडेल यांनी यावेळी व्यक्त केल्या.