आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार का?, सचिन अहिर यांचा मनसेला सवाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 18:19 IST2023-04-05T18:15:16+5:302023-04-05T18:19:03+5:30
मनसेला संपलेला पक्ष म्हणून हिणवणाऱ्या आदित्य ठाकरे यांना २०२४ मध्ये वरळीतून एक सामान्य महाराष्ट्र सैनिक पराभूत करून दाखवेल, असं आव्हान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिलं होतं.

आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार का?, सचिन अहिर यांचा मनसेला सवाल!
मुंबई-
मनसेला संपलेला पक्ष म्हणून हिणवणाऱ्या आदित्य ठाकरे यांना २०२४ मध्ये वरळीतून एक सामान्य महाराष्ट्र सैनिक पराभूत करून दाखवेल, असं आव्हान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिलं होतं. त्यावर आज ठाकरे गटाचे आमदार सचिन अहीर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सचिन अहिर यांनी देशपांडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना मनसे काय मग वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरे यांना निवडणूकीच्या मैदानात उतरवणार आहे का?, असा सवाल सचिन अहिर यांनी केला आहे.
लोकमत आयोजित 'द चेंज मेकर्स-२०२३' पुरस्कार सोहळा आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. यावेळी पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आमदार सचिन अहिर यांनी छोटेखानी मुलाखतीत राजकीय विषयांवर देखील भाष्य केलं. "वरळीतील नागरिकांनी एक नेता निवडून दिला आहे. ठाकरे घराण्यातील एक नेता तयार करण्याचं काम वरळीतील नागरिकांनी केलं आहे. आता आदित्य ठाकरेंचा पराभव करण्याचं मनसे बोलत असेल तर त्यांच्या तोडीचा उमेदवार म्हणून मनसे राज ठाकरे यांना वरळीतून निवडणुकीला उभं करणार आहे का?, हल्ली वरळीवर कोणीही काहीही बोलतं", असं सचिन अहिर म्हणाले.
...तर विश्वास कुणावर ठेवायचा?
राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलत असताना सचिन अहीर यांनी चिंता व्यक्त केली. राज्यात झालेला सत्ताबदल पाहता कुणीही सांगेल की ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राजकारणात असं होत राहिलं तर जनतेनं विश्वास तरी कुणावर ठेवायचा असा प्रश्न निर्माण होईल, असं सचिन अहिर म्हणाले.