राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 07:50 IST2025-10-30T06:40:42+5:302025-10-30T07:50:09+5:30
उघड करणार मतदार यादीतील अनियमितता

राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
मुंबई : वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात गुरुवारी होणाऱ्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे मतदार यादीतील गोंधळ, बोगस नावे, मतचोरी आणि ईव्हीएम घोटाळ्यांवर सविस्तर सादरीकरण करणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली.
राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शहराध्यक्ष संदीप देशपांडे, उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या ४ दिवसांपासून बैठका सुरू आहेत. मतदार यादीतील घोळ आणि संभाव्य बोगस मतदान यावर बैठकीत चर्चा केली जात असून, मेळाव्यातून काही विधानसभा मतदारसंघांतील मतदार यादीतील अनियमितता ठाकरे उघड करणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
निवडणूक आयोगाविरोधातील १ नोव्हेंबरच्या ‘सत्याचा मोर्चा’तून ‘मनसे’चे वेगळे अस्तित्व दिसले पाहिजे. वेळेत पोहोचण्यासाठी मनसैनिकांनी लोकल ट्रेनने प्रवास करावा. प्रवासात जनतेशी संवाद साधावा, अशा सूचना राज यांनी बैठकीत दिल्याचे समजते.
सत्ताधाऱ्यांनीही मोर्चाला यावे : संदीप देशपांडे
निवडणूक आयोगावर आक्षेप घेतले असताना त्याचे उत्तर आयोगाने देणे अपेक्षित आहे. मात्र, भाजप आणि शिंदेसेनेचे नेते उत्तर का देतात ते कळत नाही. आमचे प्रश्न त्यांना नाहीत.
निवडणूक आयोगाने स्वतःचे अधिकार भाजपला दिले आहेत का? उलट मतदार घोळाबाबत त्यांनीही आमच्या मोर्चात सहभागी व्हावे, अशी त्यांना विनंती आहे, असे ‘मनसे’चे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.
‘सत्याचा मोर्चा’साठी विशेष टी-शर्ट
‘सत्याचा मोर्चा’मध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नवी मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे यांनी विशेष टी-शर्ट तयार केले आहेत. ‘सत्याचा मोर्चा-खोट्या नाही, खऱ्या मतदारांची लढाई’ असा मजकूर लिहिलेल्या या टी-शर्टचे मनसे नेते अमित ठाकरे यांनी राजगड कार्यालयात अनावरण केले.