महेश पवार
मुंबई : मुंबईत उद्धवसेनेकडून ‘शिव सर्वेक्षण यात्रा’ सुरू करण्यात आली होती. मुंबईतील ३६ विधानसभा क्षेत्रांसाठी नेमलेल्या निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला असून, जानेवारीपासून उद्धव ठाकरे मुंबईतील सर्व शाखांना भेट देऊन शाखाप्रमुखांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेणार आहेत. समोर कुणीही असले तरी लढणे थांबविणार नाही, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेच्या शिव सर्वेक्षणामध्ये गटप्रमुखांनी स्वबळावर लढण्याची मागणी निरीक्षकांकडे केली होती.
निरीक्षकांनी आपला अहवाल मातोश्री निवासस्थानी ठाकरे यांच्याकडे शनिवारी सुपुर्द केला. यावेळी पक्षाचे नेते विनायक राऊत उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले.
प्रसंगी रस्त्यावर उतरू
ठाकरे यांनी निरीक्षकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि जानेवारीत शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख आणि विभागप्रमुखांशी चर्चा करून निर्णय जाहीर करू. कोणी सोबत असो वा नसो, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी लढणे कधीच थांबणार नाही. कुणीही विरोधक असला तरी आपली भूमिका कायम मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठीच असेल. त्यासाठी रस्त्यावर उतरू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.