मुंबई - मिठी नदी गाळ घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी नेमून तब्बल ३.५ लाख फोटो तपासासाठी दिले आहेत. या घोटाळ्यातील दोषींना सोडणार नाही. पालिका आयुक्त, लिपिक, तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष, समिती सदस्य सर्वांना चौकशीच्या फेऱ्यात आणले जाईल. तसेच निविदांवर बाहेरून नियंत्रण ठेवणाऱ्या अदृष्य शक्तींचाही तपास करून कारवाई केली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत सांगितले.
भाजप आ. राजनाथ सिंह यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मिठी नदी गाळ घोटाळ्याचा प्रश्न विचारला. २००५ ते २०२४ पर्यंत मिठी नदीतील गाळ व स्वच्छतेसाठी ३३१ कोटी ७३ लाख रुपये खर्च करूनही गाळ तसाच आहे. यात भ्रष्टाचार झाला असून, दोषींवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. मंत्री सामंत यांनी उत्तर देताना, या तपासाची कक्षा रूंदावण्यात येत असून, एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. एसआयटीला आवश्यक ती कागदपत्रं दिली आहेत. लवकरच हा तपास पूर्ण होऊन मोठे मासे गळाला लागतील, असे सांगितले.
उंदीर गेले कुठे ते ही शोधा : आ. परबगाळ घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी योग्य आहे. परंतु, मुंबईतील उंदीर शोधण्यासाठी पालिकेने आणलेल्या योजनेचीही चौकशी करा. ते उंदीर कुठे गेले ते ही शोधा. उंदीर मारण्याच्या मोहिमेचे पैसे कुठे गेले ते शोधून सत्य बाहेर आणा. त्यामागील अदृश्य शक्तींनाही सोडू नका, अशी मागणी उद्धवसेनेचे आ. अनिल परब यांनी केली.
उंदीर मारण्यासाठी ५०० रु.भाजप आ. प्रसाद लाड यांनी मुंबईतील एक उंदीर मारण्यासाठी ५०० रुपये घेण्यात आले. मात्र, किती उंदीर मारले, कोणत्या विभागात जास्त उंदीर मारले, याचीही आकडेवारी द्या. मुंबई महापालिका पोखरणाऱ्या त्या उंदरांचा बंदोबस्त करा, अशी मागणी केली.