दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 05:35 IST2025-07-01T05:33:15+5:302025-07-01T05:35:15+5:30
हिंदी सक्तीचा निर्णय त्यांचा, आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले

दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
मुंबई : हिंदीबाबत आम्ही समिती नेमली आहे. समिती ठरवेल; आम्ही कोणत्याही पक्षाचे हित बघणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे हित बघू. विद्यार्थ्यांच्या हिताचे जे असेल, तोच निर्णय महाराष्ट्र सरकार घेईल. कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात माशेलकर समितीचा जो अहवाल आला होता, तो येण्यामध्ये उद्धव यांचा उजवा हात असलेल्या उपनेत्याची भूमिका महत्त्वाची होती. त्या अहवालात पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा, असे म्हटले होते. तो अहवाल उद्धव यांनी स्वीकारला. मी त्याचे पुरावे दिले आहेत. तरीही या मुद्द्यावर नेहमीच्या पद्धतीने ठाकरे यांनी घुमजाव केले. आम्ही कोणताही इगो न ठेवता हिंदीबाबतचे जीआर रद्द केले. पुन्हा सांगतो की, समितीचा अहवाल आणि विद्यार्थी हित कशात आहे, या आधारेच आमचे सरकार निर्णय घेईल.
ठाकरे बंधू एकत्र न येण्याचा जीआर मी काढलेला नाही
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येण्याबद्दल विचारले असता फडणवीस यांनी मिश्कील टिप्पणी केली. ते म्हणाले की, दोन भावांनी एकत्र येऊ नये, असा मी जीआर काढला आहे का? दोन भाऊ एकत्र येत असतील, तर मला अतिशय आनंद आहे. दोन भावांनी जरूर एकत्रित यावे, क्रिकेट खेळावे, हॉकी खेळावे, टेनिस खेळावे, स्वीमिंग करावे, जेवण करावे, आम्हाला काहीही हरकत नाही.
विषय शिक्षणाचा अन् समिती मात्र अर्थतज्ज्ञांची : उद्धव ठाकरे
विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य शासनाने हिंदी विषयावर नेमलेल्या नरेंद्र जाधव समितीवर आक्षेप नोंदविला.
‘आता नवीन एक समिती नेमली आहे. त्यांच्या पांडित्याचा किंवा बुद्धिमत्तेचा आदर राखून मी सरकारला सांगतो आहे की तुम्ही अशी थट्टा करू नका. कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि समिती अर्थतज्ज्ञांची नेमली आहे. अर्थात, कुणाचीही समिती बसवली तरी आता महाराष्ट्रावर हिंदी सक्तीचा विषय संपला आहे,’ असे ठाकरे म्हणाले.
वेळ आणि ठिकाण लवकरच
राज ठाकरे पुढे म्हणाले, येत्या ५ तारखेला विजयी मेळावा होईल. या मेळाव्यात कोणताही झेंडा नसेल. सरकारने जी काही नवीन समिती नेमली आहे तिचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवली जाणार नाही हे नक्की. मेळाव्याची वेळ आणि ठिकाण लवकरच निश्चित केली जाईल, असे ठाकरे यावेळी म्हणाले. उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि इतरही काही पक्षाने पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त करून ‘न भूतो न भविष्य’ असा हा मोर्चा निघाला असता, असेही मत त्यांनी मांडले.
५ जुलैला ठाकरे बंधूंचाएकत्र विजयी मेळावा
राज्य शासनाने पहिलीपासून हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केल्यानंतर मनसे-उद्धवसेना आणि विरोधी पक्षांचा ५ जुलैचा नियोजित मोर्चाही रद्द करण्यात आला आहे. आता ठाकरे बंधूंनी ५ जुलैला विजयी मेळावा घेण्याचे ठरवले आहे. राज ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. तसेच हा पक्षविरहित मराठी माणसांचा मेळावा असेल आणि यापुढेही राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवली जाणार नाही हे नक्की, अशी आपली भूमिका असल्याचे स्पष्ट केले. इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. २९ जूनला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली, असे म्हणत राज ठाकरे यांनी ‘हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय’ असल्याचे सांगत तमाम मराठी जनांचे मनापासून अभिनंदन केले.