Join us  

CoronaVirus News: महाराष्ट्रातील रेड झोन क्षेत्रात आता लॉकडाउनचे निर्बंध शिथिल होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 3:45 AM

१९ महापालिका वगळता अन्य ठिकाणी सगळे व्यवहार सुरू करण्यास परवानगी द्यावी, खाजगी व सरकारी कार्यालयांना आताच परवानगी आहे व अनेक ठिकाणी ती पूर्ण क्षमतेने चालू आहेत, ती तशीच चालू राहतील.

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : केंद्र सरकार लॉकडाऊनबद्दल काय भूमिका घेणार, हे पाहून राज्य सरकार आपली भूमिका जाहीर करणार आहे. राज्यातील १८ महापालिका क्षेत्रांत रेडझोन आहे. तेथे लॉकडाऊन कायम ठेवायचा की त्या ठिकाणचे जे भाग कंटेन्मेंटमध्ये आहेत ते पूर्णपणे बंद ठेवून बाकीच्या भागात शिथिलता द्यायची, याचा निर्णय शनिवारी होणार आहे. मुंबई महापालिकेने कंटेन्मेंट एरियात कडक लॉकडाऊनची व अन्य भाग खुला करण्याची शिफारस केली आहे.

जर असे झाले तर जे भाग खुले केले जातील त्या भागात रोज बारकाईने लक्ष ठेवले जाईल. दिल्लीत सगळे खुले केले व एकाच दिवसात एक हजाराने रुग्ण वाढले. तसे होऊ नये म्हणून रोजच्या रोज प्रत्येक एरिया पाहणीखाली ठेवला जाईल. दरम्यान, मनोज सौनिक, राजीव मित्तल, रजनीश सेठ व भूषण गगराणी या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने शहरातील मैदाने खुली करण्याची शिफारस केली आहे. चालणे, धावणे, सायकलिंग यासाठी परवानगी द्यावी, अन्य कोणत्याही कामासाठी ती वापरू नयेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

१९ महापालिका वगळता अन्य ठिकाणी सगळे व्यवहार सुरू करण्यास परवानगी द्यावी, खाजगी व सरकारी कार्यालयांना आताच परवानगी आहे व अनेक ठिकाणी ती पूर्ण क्षमतेने चालू आहेत, ती तशीच चालू राहतील. मुंबईत जोपर्यंत लोकल सेवा सुरू होत नाही तोपर्यंत मुंबई सुरू झाली, असे म्हणता येणार नाही, असे सांगून ज्येष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, मुंबई सुरू करण्यासाठी दिल्लीतून दबाव येत आहे. मुंबई सुरू झाली की, जगात चांगला संदेश जाईल. त्यासाठीच कंटेन्मेंट एरिया वगळून मुंबई सुरू करण्यावर बैठका होत आहेत.

लॉकडाउन ५ : केंद्र सरकार द्विधा मन:स्थितीत

नवी दिल्ली : कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या पहिल्या दहा देशांमध्ये भारत नवव्या क्रमांकावर आहे. देशात या आजाराचा फैलाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या स्थितीत ३१ मे रोजी संपत असलेल्या लॉकडाऊनला मुदतवाढ द्यावी की न द्यावी किंवा मुदतवाढ दिल्यास कधीपर्यंत द्यावी, या गोष्टींबाबत केंद्र सरकार द्विधा मन:स्थितीत आहे. मुदतवाढ मिळाल्यास लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात होईल. लॉकडाऊनमधील स्थिती, कोरोना साथीचा फैलाव आदी गोष्टींबाबत गेल्या दोन दिवसांत काही बैठकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.13,36,361 लोक राज्याबाहेर गेले : महाराष्ट्रातून ७९० रेल्वे व २५,९३७ बसेसच्या माध्यमातून आजपर्यंत १३,३६,३६१ लोक आपापल्या राज्यात गेले आहेत. रोज किमान ४० रेल्वे जात आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

ग्रामीण भागातील शाळा सुरूकरण्याचा विचार

ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. त्याठिकाणी शाळा सुरू करण्यासाठीदेखील दोन बैठका झाल्या. त्यावर पुन्हा येत्या आठवड्यात बैठक होणार आहे. मात्र, त्यांचा आणि अन्य ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पुढे कसा एकत्रित करायचा, यावर तज्ज्ञांची मते घेतली जात आहेत, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

या आहेत १८ मनपा

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भार्इंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, अमरावती, जळगाव, अकोला, धुळे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याउद्धव ठाकरे