Join us

मुंबईकरांचे नाटक, सिनेमा पाहणे महागणार? पालिकेकडून रंगभूमी करवाढीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 07:56 IST

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी कर वाढविण्याचा प्रस्ताव महापालिकेने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नव्या वर्षात नाटक-सिनेमा पाहणे मुंबईकरांसाठी महाग होण्याची शक्यता आहे. गेल्या १३ वर्षांपासून मुंबई महापालिकेने रंगभूमी करात वाढ केलेली नाही. त्यामुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी कर वाढविण्याचा प्रस्ताव महापालिकेने केला आहे. अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार वातानुकूलित चित्रपटगृहांतील प्रत्येक खेळावरील कर ६० वरून २०० रुपये, तर विनावातानुकूलित चित्रपटगृहांसाठी प्रत्येक खेळावरील कर ४५ वरून ९० रुपये होईल. तर नाटकांच्या प्रत्येक प्रयोगावरील २५ रुपये कर १०० रुपये होण्याची शक्यता आहे.

एकीकडे २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या निवासी मालमत्तांना मालमत्ता करातून पूर्णत: सूट दिल्याने पालिकेच्या महसुलात घट झालेली दिसून येते. तर दुसरीकडे   गेल्या १० ते १२ वर्षांपासून सिंगल स्क्रीनच्या तुलनेत अद्ययावत मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांची संख्या वाढली आहे. यामध्ये एक ते आठ पडदे असलेल्या चित्रपटगृहांचा समावेश आहे. पालिका रंगभूमी कर म्हणून नाममात्र शुल्क आकारते त्यामुळे आता १३ वर्षानंतर पालिका या करात वाढ करण्याचा विचार करीत आहे.

१३ वर्षांपासून वाढ नाही

पालिकेकडून चित्रपटगृह, नाटक, सर्कस, आनंदमेळा आदींचे प्रयोग व खेळांवर रंगभूमी कर आकारण्यात येतो. पालिकेच्या उत्पन्नामध्ये या कराचे स्वतंत्र दायित्व असल्याने तो स्वतंत्रपणे वसूल केला जातो. २०१०-११ या आर्थिक वर्षात रंगभूमी करात वाढ झाली होती. त्यानंतर २०१५-१६मध्ये पालिकेने करवाढीचा प्रस्ताव तयार करून तो राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठवला होता. ही वाढ साधारण १० टक्क्यांपर्यंत होती मात्र अद्यापपर्यंत यावर निर्णय झाला नव्हता.

दर सारखेच

वातानुकूलित नसलेल्या सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांतील तिकिटांचे दर मल्टिप्लेक्सच्या तुलनेत कमी आहेत. सद्यस्थितीत मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे आणि सिंगल स्क्रीन वातानुकूलित चित्रपटगृहे यांना सारख्याच दराने रंगभूमी कर आकारला जातो.

टॅग्स :नाटकमुंबई महानगरपालिका