महानगरांलगत ‘काऊ हॉस्टेल’ संकल्पना राबविणार: पुरुषोत्तम रूपाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 09:09 AM2021-10-19T09:09:39+5:302021-10-19T09:09:50+5:30

मुंबईतील हिरे व्यावसायिकांतर्फे सत्कार

will implement 'Cow Hostel' concept in metropolitan areas says Purushottam Rupala | महानगरांलगत ‘काऊ हॉस्टेल’ संकल्पना राबविणार: पुरुषोत्तम रूपाला

महानगरांलगत ‘काऊ हॉस्टेल’ संकल्पना राबविणार: पुरुषोत्तम रूपाला

Next

मुंबई : भारतात गोधनाला सर्वश्रेष्ठ धन मानले जाते. त्यामुळे गोधनाच्या रक्षेसाठी देशभरातील महानगरांलगत ‘काऊ होस्टेल’ ही संकल्पना राबविण्याचा मानस असल्याची माहिती केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी दिली.

केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल मुंबईतील हिरे व्यावसायिकांतर्फे रूपाला यांचा सत्कार करण्यात आला. वांद्रे कुर्ला संकुलात सोमवारी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. जगभरातील महासत्तांनी कोरोनापुढे शरणागती पत्कारली असताना, भारताने खंबीरपणे या साथरोगाचा सामना केला. वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांनी अगदी कमी वेळेत त्यावर स्वदेशी लस शोधून काढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांच्या कर्तबगारीवर विश्वास दाखवून, तिच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली. त्यामुळे लसीकरणाची गती वाढवून कोरोना प्रसाराला अटकाव करण्यात यश मिळाले आहे.

कोरोनाचे थैमान सुरू असताना, आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या.  त्यामुळे परदेशात अडकलेल्या नागरिकांचे हाल झाले. ही बाब हेरून केंद्राने वंदे भारत अभियान सुरू केले. त्यातून विविध देशांत अडकलेल्या भारतीयांना एअर इंडियाच्या मदतीने मायदेशी परत आणण्यात आले. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या संकल्पनेचे अनेक देशांनी अनुकरण केले. त्यामुळे मोदी हे भारताला लाभलेले द्रष्टे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात भारत उत्तरोत्तर उंच भरारी घेत राहील, असेही रूपाला यांनी सांगितले. या कार्यक्रमाला भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता, कोलिन शहा, महेंद्र गांधी, किरीट भन्साली यांच्यासह मुंबईतील हिरे व्यावसायिक उपस्थित होते.

शेतकरीपुत्र ते केंद्रीय मंत्री
शेतकरीपुत्र ते केंद्रीय मंत्री अशी पुरुषोत्तम रूपाला यांची कारकिर्द राहिली आहे. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिकांशी त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यांची भेट घ्यायची असल्यास कोणत्याही मध्यस्थाची गरज नसते. कितीही व्यस्त असले, तरी ते वेळ काढतात. त्यांचे नेतृत्व कौशल्य असामान्य असून, प्रत्येकाला प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार किरीट भन्साली यांनी काढले.

Web Title: will implement 'Cow Hostel' concept in metropolitan areas says Purushottam Rupala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.