लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आचारसंहितेचे उल्लंघन केले, पण त्यांच्यावर निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली. आयोगाने केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली, पण मोदींवर कारवाई केली नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अशा प्रकरणात कठोर कारवाई झाली होती. मग नरेंद्र मोदींवर आयोग कारवाई का करत नाही, असा प्रश्न विचारून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
यासंदर्भात टिळक भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले की, २८ डिसेंबर रोजी सोलापुरातील सांगोला मतदारसंघात मोदी, तत्कालीन रेल्वेमंत्री, कृषिमंत्री यांनी सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालीमार या किसान रेल्वेच्या १०० व्या गाडीचा शुभारंभ केला.
कारवाईस निवडणूक आयोगाची टाळाटाळ
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका व पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू होत्या. याविषयी प्रफुल्ल कदम यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असता आचारसंहिता भंग झाल्याचे मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज देण्यात आली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कारवाई केली जात नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.