Uddhav Thackeray: मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी कोणती रणनिती आखणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. एकीकडे वरळीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत असं म्हटलं होतं. दुसरीकडे राज ठाकरेंनी याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. मात्र दोन्ही पक्षातील नेते आणि पदाधिकारी निवडणुकीसाठी एकत्र येण्यासाठी सहमत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या संदर्भात महत्त्वाचे विधान केलं आहे.
हिंदी सक्तीच्या विरोधात अनेक वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. राज्य सरकारने त्रिभाषा सुत्राचा निर्णय मागे घेतल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजयी सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. निवडणूक जाहीर झाल्यावर राज ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
"२० वर्षांनंतर आम्ही एकत्र एका व्यासपीठावर आलो. पहिल्यांदा आम्ही मराठीच्या विषयावर एकत्र आलो. ते मी आधीच सांगितलं की आम्ही एकत्र आलोय तर ते एकत्र राहण्यासाठीच. मराठीच्या विषयावर आम्ही एकत्रच राहणार आहोत. पुढे मुद्दा येतो तो राजकारणाचा. आता कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाही. जेव्हा निवडणूक जाहीर होईल, त्यावेळी आम्ही चर्चा करू," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या हाणमारीवरूनही भाष्य केलं. "विधानभवनात हाणामारी झाली, अध्यक्षांनी उच्चस्तरिय चौकशी नेमली आहे. या गुंडांची इतकी हिंमत झाली आहे. कारवाई एकायला चांगली आहे, मात्र धाडस झालं कसं? असा सवाल ठाकरेंनी केला. सत्तेच्या लालसेपोटी हे राजकारण सुरु आहे. हे सत्तेच माजकारण आहे असे ठाकरे म्हणाले. चड्डी गँगवाले माईक टाईसन समजतात. गळ्यात दात घालून फिरणारे कसे माजलेत. यांना कोणी जाब विचारणार की नाही," असे ठाकरे म्हणाले.