संतोष धुरींना मेसेज अन् CM फडणवीसांसोबत ३० मिनिटे चर्चा; नितेश राणेंनी मनसेचा शिलेदार भाजपमध्ये कसा आणला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 09:27 IST2026-01-06T09:09:13+5:302026-01-06T09:27:14+5:30
ठाकरे बंधूंना भाजपचा डबल झटका बसला शुभा राऊळ यांच्यानंतर आता मनसेचे संतोष धुरी पक्षप्रवेश करणार आहेत.

संतोष धुरींना मेसेज अन् CM फडणवीसांसोबत ३० मिनिटे चर्चा; नितेश राणेंनी मनसेचा शिलेदार भाजपमध्ये कसा आणला?
Santosh Dhuri: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे नऊ दिवस शिल्लक असताना, मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या शुभा राऊळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायरब्रँड नेते आणि राज ठाकरेंच्या कोअर टीमचे सदस्य संतोष धुरी यांनी जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मनसेसाठी हा अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तिकीटावरुन नाराज नसल्याचे संतोष धुरी यांनी म्हटलं.
गेल्या अनेक वर्षांपासून मनसेचे आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे संतोष धुरी हे वॉर्ड क्रमांक १९४ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, जागावाटपाच्या गणितात हा वॉर्ड ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याने आणि तेथून निशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने धुरी कमालीचे नाराज होते. यानंतर नॉट रिचेबल असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर सोमवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले.
रातोरात भेटीगाठी आणि प्रवेशाचा मुहूर्त
संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशाची पटकथा काल रात्रीच लिहिली गेली. काल रात्री मंत्री नितेश राणे यांच्यासोबत धुरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. आज दुपारी १ वाजता भाजप आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत ते अधिकृतपणे भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. माध्यमांशी बोलताना धुरी यांनी आपली खदखद व्यक्त केली. मनसेमध्ये माझ्या कष्टाची कदर केली गेली नाही. पक्ष सोडण्याचा निर्णय घेत असतानाही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी किंवा संदीप देशपांडे यांच्याशी चर्चाही केली नसल्याचे संतोष धुरी म्हणाले.
"काल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी नितेश राणेंच्या सोबत मी गेलो होतो. मला त्यांना तात्काळ भेट दिली याचे बरे वाटले. नितेश राणे यांनी संपर्क केला आणि ते सिंधुदुर्गावरुन विमानाने आले. त्यांना माझ्याबद्दल काहीतरी चांगले वाटलं असेल म्हणूनच ते आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अर्धा तास गप्पा झाल्या. त्यांना भेटून चांगले वाटले. निवडणुकीचे तिकीट मिळण्याचा विषय नाही. मी नाराज झालेलो नाही," असं संतोष धुरी यांनी स्पष्ट केले.
"माझी जी राजकीय दिशा आहे ती दुपारी स्पष्ट करणार आहे. राज ठाकरे, संदीप देशपांडे कुणीही माझ्याशी संपर्क साधलेला नाही. त्यांनी मैत्री ठेवली तर कायम असेल. मी कुणाशीही चर्चा केलेली नाही. हा निर्णय दोन दिवसात घेतला. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते त्याप्रमाणे मी गेलेलो आहे. मी शिस्तप्रिय आहे. कुठल्याही अटीशर्तीवर जाणं मला पटत नाही. मनसेमध्ये आलो तेव्हा साहेबांना आम्ही काही सांगितले नव्हते," असेही संतोष धुरी म्हणाले.