Join us

'तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधा, आम्ही बाबरी मशीद उभारू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 19:02 IST

अबू आझमींच्या मुलाच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील, तर आम्हीदेखील त्यांच्यासोबत अयोध्येला जाऊ. ते तिथे राम मंदिर उभारतील आणि आम्ही बाबरी मशिदीची उभारणी करू, असं विधान समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर फरहान आझमींनी हे विधान केलं आहे. 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून ७ मार्चला अयोध्येला जाणार असतील, तर मीदेखील त्यांच्यासोबत जाईन. मी माझ्या बाबांनादेखील सोबत घेऊन जाईन. समाजवादी पक्षाचे आमदार आणि महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनादेखील मी अयोध्येला येण्याचं आवाहन करेन. मुख्यमंत्र्यांनी अयोध्येचं तिकीट काढल्यास आम्ही इथून पायी निघू. ते तिथे राम मंदिर उभारतील, तर आम्ही तिथे बाबरी मशीद उभारू,' असं फरहान आझमींनी म्हटलं आहे.  सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत फरहान आझमी बोलत होते. त्यावेळी त्यांनी अयोध्या, राम मंदिर, बाबरी मशिदीवर भाष्य केलं. राज्य सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जातील, अशी घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणमुळे मुस्लिम समुदायात चिंतेचं वातावरण असल्याचं आझमी म्हणाले.  फरहान आझमी यांच्या विधानावरुन भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. वाह रे ठाकरे सरकार म्हणत सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. तर आझमी यांनी केलेलं विधान त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात कोणताही बदल झालेला नाही. उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा निवडणुकीपूर्वीच निश्चित झाला आहे. फरहान आझमींनी व्यक्त केलेले हे त्यांचे वैयक्तिक मत आहे,' असं सामंत यांनी म्हटलं. 

टॅग्स :अयोध्याराम मंदिरउद्धव ठाकरेअबू आझमी