Will Abu Azmi win a hat-trick of victories? | Maharashtra election 2019 : अबू आझमी विजयाची हॅट्ट्रिक साधणार का?

Maharashtra election 2019 : अबू आझमी विजयाची हॅट्ट्रिक साधणार का?

- जमीर काझी 
मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंड आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे कायम चर्चेत राहिलेल्या मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात एकूण १० उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत ही सपाचे अबू आझमी आणि शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांच्यातच होणार आहे.


या दुरंगी लढतीस अनेक कंगोरे असून लोकरे यांना शिवसैनिकांची पूर्ण नाराजी दूर करण्यात यश आले तरच आझमी यांच्या विजयाची हॅट्ट्रिक रोखण्याला ताकद मिळेल. अन्यथा सायकलीचा मार्ग मोकळा होईल.
दोन्ही कॉँग्रेसचा पाठिंबा मिळवीत अबू आझमी यांनी प्रचार सुरू केला. तर शिवसैनिकांमध्ये पक्षप्रमुखांनी ‘आयात’ उमेदवार लादल्याची भावना अद्याप कमी झालेली नाही. या मतदारसंघाचे दहा वर्षे प्रतिनिधित्व करीत असलेल्या अबू आझमी यांना गेल्या वेळी दोन्ही कॉँग्रेस आणि एमआयमच्या उमेदवाराशी सामना करावा लागला होता. या वेळी त्यांनी या तीनही पक्षांचा पाठिंबा मिळविल्याने मतविभागणीचा धोका टळला आहे.

जमेच्या बाजू
दहा वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत असल्याने मतदारसंघातील प्रत्येक घटकांशी संपर्क आहे.
अल्पसंख्याक समाजाचे एकगठ्ठा व निर्णायक मतदान हाही महत्त्वाचा मुद्दा.
कॉँग्रेस आघाडी व एमआयएमचा पाठिंबा मिळवल्याने आझमी यांना मतविभागणीचा धोका नाही.
आपले कौशल्य पणाला लावून त्यांनी कॉँग्रेसचे बंडखोर नगरसेवक सुफियान वेणू यांना माघार घेण्यास लावले.
कार्यकर्त्यांना सहजपणे उपलब्ध होणारा राजकारणी अशी लोकरे यांची ओळख आहे. नाराज कॉँग्रेसच्या नेत्यांचा छुपा पाठिंबा त्यांना मिळतो आहे. तसेच विद्यमान आमदाराविरुद्धच्या नाराजीची त्यांना मदत मिळते आहे. या वेळी तिकीट न दिल्याने सेनेचे बुलेट पाटील यांनी बंडखोरी केली होती. मात्र ‘मातोश्री’च्या सूचनेनंतर त्यांचेही बंड थंड झाले.

उणे बाजू
देवनार डम्पिग ग्राउंड हटविण्यात आलेले अपयश ही सगळ्यात मोठी उणे बाजू आहे. सलग दहा वर्षे प्रतिनिधित्व केल्याने साठलेल्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे ही अडचणीची बाब असून काही कॉँग्रेस नेत्यांचा विरोध हाही त्यांंना त्रासदायक आहे.
तिकीट मिळविण्यासाठी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होतो आहे. त्यामुळेच निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी त्यांना भोवण्याची भीती आहे. शिवाय महायुती अंतर्गत गटबाजीचा फटका बसण्याचा धोका आहेच. तसेच, अल्पसंख्याक समाजाचे एकगठ्ठा मतदान फिरवण्याचे आव्हान आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Will Abu Azmi win a hat-trick of victories?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.