Join us  

पत्नीला ‘जाडी’ म्हणाला म्हणून पतीविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 11:41 AM

पत्नी ‘जाडी’ असल्यामुळे लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तिच्या जाडेपणावर हिणवण्यास पतीने सुरुवात केली.

मुंबई : पत्नी ‘जाडी’ असल्यामुळे लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तिच्या जाडेपणावर हिणवण्यास पतीने सुरुवात केली. अखेर पत्नीने पोलिसांत धाव घेतली. पत्नीच्या तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, बीकेसी पोलीस अधिक तपास करत आहेत. बीकेसी परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय नेहाचे (नावात बदल) इंदोरच्या तरुणाशी विवाह झाला. लग्न ठरल्यापासून पतीने तिच्या जाडेपणावरून हिणवण्यास सुरुवात केली. माहेरच्यांनी लग्नाचा सर्व खर्च उचलला, तसेच मुलीला १८ लाखांचे दागिनेही लग्नात दिले. एवढे सगळे करूनदेखील पती ‘जाडी’ बोलून अपमान करत असल्याचा पत्नीचा आरोप आहे.

याच कारणावरून दोघांमध्ये खटके उडायला लागले. ‘तुझ्यासारख्या जाड्या मुलीशी कोणीही लग्न केले नसते. त्यामुळे पुढे संसार टिकवायचा असेल तर माहेराहून पैसे आण,’ असे सांगत पतीने १० लाख रुपयांसह कारची मागणी केल्याचेही पत्नीने तक्रारीत नमूद केले आहे. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून नेहाने तिने हा प्रकार माहेरच्यांना सांगितला. त्यानंतर, पती ‘जाडी’ बोलून अपमान करतो, म्हणत तिने पोलिसांत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ते अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :मुंबईपोलिसलग्न