Join us
Daily Top 2Weekly Top 5

बीडीडी चाळीतील पात्रताधारकांची निश्चिती का अडली?; देवेंद्र फडणवीसांनी दिले कार्यवाहीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 07:22 IST

गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुंबई म्हाडाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर आदी बैठकीस उपस्थित होते.

मुंबई : बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्याचे निर्देश देतानाच या चाळींमधील पात्रताधारक निश्चित करण्यास विलंब होत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एका बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास कामांचा आढावा फडणवीस यांनी मंत्रालयातील बैठकीत घेतला. खोलीधारक आणि दुकानधारकांच्या पात्रता निश्चितीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आले आहे. हे काम पूर्ण होत नसल्याने प्रत्यक्ष बांधकामास सुरूवात होवू शकलेली नाही, या विषयावर बैठकीत चर्चा झाली. 

गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुंबई म्हाडाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर आदी बैठकीस उपस्थित होते. पुनर्विकासाची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करा. कोरोना काळात ताब्यात घेण्यात आलेल्या इमारती कामासाठी त्वरित रिकाम्या करून घेण्यात याव्यात. पात्रतेचे विषय तातडीने निकाली काढावेत, भाडे आधीच देऊन स्थलांतराची कामे तातडीने सुरू होतील याकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले.

१५,५९३ सदनिका 

या पुनर्वसन प्रकल्पांतर्गत एकूण १५,५९३ सदनिका निर्माण होणार आहेत. वरळी येथील चाळींचे काम सुरू झाले असून नायगाव येथील चाळींचे काम जानेवारीपासून सुरू होत आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची कामे,कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकास यांच्या सद्यस्थितीबाबत सादरीकरण करण्यात आले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकार