'वरण-भाता'ने घडवला राडा; आमदार निवासातील वाद विकोपाला का गेला? आमदार गायकवाड म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:52 IST2025-07-09T12:48:59+5:302025-07-09T12:52:32+5:30
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणानंतर संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले.

'वरण-भाता'ने घडवला राडा; आमदार निवासातील वाद विकोपाला का गेला? आमदार गायकवाड म्हणाले...
Sanjay Gaikwad ( Marathi News ) : मुंबईतील आमदार निवासमध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेचा व्हिडीओ सकाळपासूनच सोशल माडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणी आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता मारहाण प्रकरणावर आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
"मी आकाशवाणी आमदार निवासमध्ये रात्री नऊ वाजता जेवण मागितली. यामध्ये वरण आणि भात मागवला होता. वरण आणि भाताचा पहिला घास घेतला तेव्हा पहिला घास आंबट लागला. मला वाटलं लिंबू टाकला असेल तर दुसरा घास घेतल्यानंतर मला उलटी आली. त्यावेळी मी त्याला खाली जाऊन मला विष खायला घालतोय का? असा जाब विचारला. या कॅन्टीनमध्ये महाराष्ट्रातील बरीच लोक येत असतात. सामान्य लोकांना कशापद्धतीचे जेवण देत असतील. आमदारालाच असे जेवण देत असतील तर सामान्य लोकांची काय अवस्था असेल?, असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला.
" काल मला अनेकजण भेटले त्यावेळी ते म्हणाले, काल आमच्या जेवणात पाल सापडली. तर कुणाला सुतळी सापडली. चपात्या पण वाईट असतात. आम्ही गावी जात असताना यांच्याकडे पार्सल घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी आम्हाला काही सुचत नाही, यांच्या जेवणामुळेच हो त्रास होतो, म्हणून मी त्यांना चाप दिला, असंही संजय गायकवाड म्हणाले.
आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
आकाशवाणी आमदार निवासातील खोली क्रमांक १०७ मध्ये जेवण द्या असे आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनमध्ये सांगितले होते. त्या रुममध्ये जेवण देण्यात आले. पण, कँटिनमधून पाठवण्यात आलेली डाळ निष्कृष्ट दर्जाची होती आणि तिचा वास येत होता.
ही डाळ खाल्ल्याने काहींचे पोट बिघडले आणि मळमळू लागल्याची माहिती आहे. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी थेट कँटिन गाठलं. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याला पकडलं आणि जाब विचारला. डाळीचा वास घेऊन बघ असं म्हणतच त्यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली.