सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 07:01 IST2025-10-30T07:00:55+5:302025-10-30T07:01:24+5:30
मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयात उपचाराकरिता दाखल होणाऱ्यांपैकी सरासरी दरवर्षी २४ ते २५ ...

सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयात उपचाराकरिता दाखल होणाऱ्यांपैकी सरासरी दरवर्षी २४ ते २५ टक्के रुग्ण दगावत असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली. मात्र रुग्णालय प्रशासनाने या पैकी अधिक मृत्यू हे रुग्ण अत्यवस्थ असताना दाखल झाले होते, असे याबाबत सांगितले.
यामध्ये पहिल्या २४ तासांत मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मोठ्या संख्यने मृत्यू होत असतील तर या सर्व रुग्णांचे मृत्यू विश्लेषण करून कारणे शोधण्याची गरज असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
शासकीय रुग्णालयात मृत्यू दर हा कायमच खासगी रुग्णालयाच्या तुलनेत अधिक असतो. अनेकवेळा खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ज्यावेळी अखेर रुग्ण बरा होत नाही आणि आर्थिक बोजा कुटुंबावर वाढत असल्याचे निदर्शनास येताच काही रुग्णांचे नातेवाईक रुग्णाला शासकीय रुग्णालयात शेवटच्या टप्प्यात दाखल करत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे.
अनेक रुग्ण हे अत्यवस्थ झाल्यावर त्यांना कुटुंबीय रुग्णालयात दाखल करत असल्याचे सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतरही चांगले उपचार करण्याचा प्रयत्न असतो, अशी माहितीही त्यांनी दिली.
मृत्युदर कमी करण्यासाठी रुग्णालयात सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. यापुढे आणखी काही प्रयत्न करावयाचे असल्यास तज्ज्ञांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. डेथ ऑडिट करण्यात येईल. मात्र, यामध्ये पहिल्या २४ तासांत होणाऱ्या मृत्यूची संख्या लक्षणीय आहे. तसेच रुग्ण अत्यवस्थ झाल्यावर तत्काळ विभागातून अतिदक्षता विभागात दाखल होत असतात. डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जॉर्जेस रुग्णालय