Join us  

...म्हणून बाळासाहेबांची सेवा करणाऱ्या दीपक सावंतांचं तिकीट उद्धव ठाकरेंनी कापलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 12:34 PM

मुंबई आणि ठाणे पदवीधर मतदारसंघाची यावेळची निवडणूक शिवसेनेसाठी भलतीच प्रतिष्ठेची आहे.

मुंबईः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणात नेहमीच त्यांच्यासोबत राहिलेले आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये त्यांच्या सेवेत तत्पर असलेले शिवसेनेचे निष्ठावंत शिलेदार डॉक्टर दीपक सावंत यांचा पत्ता विधानपरिषद निवडणुकीतून कापण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. त्यापैकी, एक कारण शिवसैनिकांची नाराजी हे आहे, पण दुसरं कारण अधिक महत्त्वाचं आणि शिवसेनेसाठी 'स्वाभिमाना'चं आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत हे विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करत आहेत. गेली दोन टर्म ते वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत आणि २०१४ पासून राज्याच्या आरोग्य खात्याची सूत्रंही त्यांच्याकडेच आहेत. परंतु, त्यांच्या कामावर ना श्रेष्ठी समाधानी आहेत, ना सैनिक. आपली कामं होत नाहीत, दीपक सावंत भेटतच नाहीत, अशा तक्रारी उद्धव ठाकरेंकडे गेल्या होत्या. त्यामुळे दीपक सावंत यांना पुन्हा संधी द्यावी का, असा प्रश्न निर्माण झाला होता.

मुंबई आणि ठाणे पदवीधर मतदारसंघाची यावेळची निवडणूक शिवसेनेसाठी भलतीच प्रतिष्ठेची आहे. ठाण्यात निरंजन डावखरेंना राष्ट्रवादीतून फोडून भाजपाने मोठा डाव टाकल्यानंतर, शिवसेनेनं माजी महापौर संजय मोरे यांना रिंगणात उतरवलंय. परंतु, त्यापेक्षाही मोठी लढाई मुंबई पदवीधर मतदारसंघात होईल. इथे भाजपा उमेदवार देणार नाहीए, पण नारायण राणेंच्या स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवाराला ते पाठिंबा देतील. त्यामुळे ही लढत शिवसेना विरुद्ध नारायण राणे या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये आहे. 

असं असताना, दीपक सावंत यांना उमेदवारी देणं धोक्याचं असल्याचं उद्धव यांच्या लक्षात आलं. शिवसैनिक त्यांच्यावर नाराज आहेत, त्यांच्या नाराजीचा फायदा प्रतिस्पर्ध्यांनी घेतल्यास ही निवडणूक कठीण जाईल, असं समीकरण मांडून त्यांनी दीपक सावंत यांचं तिकीट कापलं आणि विलास पोतनीस यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. पोतनीस हे बोरिवलीचे विभाग प्रमुख आहेत आणि स्थानीय लोकाधिकार समितीचे सक्रिय सदस्यही आहेत. 

उद्धव यांच्या निर्णयानंतर, दीपक सावंत यांनी कालच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला होता. त्यातूनही त्यांची शिवसेनेवरील निष्ठा स्पष्ट होते. त्यामुळे आता त्यांच्याकडे काय नवी जबाबदारी दिली जाते, हे पाहावं लागेल.   

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेविधान परिषददीपक सावंतनिरंजन डावखरे