Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा नाराज आहेत का? कोणावर, कशासाठी? राजकीय वर्तुळात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 05:50 IST

ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण विभागात आपल्याला निर्णयांचे फारसे स्वातंत्र्य नव्हते.

मुंबई : दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे नाराज आहेत का? असतील तर कोणावर आणि कशासाठी नाराज आहेत? या बाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. पण ती जाणून घ्यायची असतील तर मागे जावे लागेल.ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण विभागात आपल्याला निर्णयांचे फारसे स्वातंत्र्य नव्हते. विशेषत: महिला व बालकल्याण विभागातील कामे ही वरून ठरल्यानुसारच करावी लागायची ही त्यांची भावना असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.परळीमध्ये त्यांचे बंधू पण कट्टर प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे यांना आपल्याच पक्षाच्या सरकारकडून बळ दिले जाते, निधी दिलाजातो, अशी त्यांची भावना होती. त्यातच परळीमधील पराभव पंकजा यांच्या जिव्हारी लागला. त्यासाठी पक्षांतर्गतही दगाफटका झाल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.पंकजा मुंडे कोणत्याही पक्षात जाणार नाहीत, असे भाजपच्या खा. पूनम महाजन यांनी स्पष्ट केले. पूनम या प्रमोद महाजन यांच्या कन्या असून, पंकजा यांच्या आत्येबहीण आहेत. पंकजा यांचे मामा प्रकाश महाजन म्हणाले की, पंकजा पक्ष बदलतील असे वाटत नाही. पराभवाचे शल्य तिच्या मनात आहे. कार्यकर्त्यांना सावरण्यासाठी तिने फेसबुकवर लिहिले असावे.पंकजा काल, आज भाजप नेत्या आहेत आणि उद्याही राहतील. अपघाताने आलेले सरकार किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. पण, त्यांच्याकडून अशा अफवा पसरविल्या जात आहेत. माध्यमांनी आता अफवा थांबवाव्यात.- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

टॅग्स :पंकजा मुंडे