Join us

‘वरुण राजा’ असा का वागतोय? गेल्या ५ वर्षांत कोसळण्याच्या कालावधीत कमालीचा बदल; अतिवृष्टीच्या घटनाही वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:53 IST

पावसाचा कालावधी कमी झाला आहे. थोड्या वेळातच अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. एक्स्ट्रीम स्पेल्समुळे शहरी भागात पूरस्थिती, वाहतूक विस्कळीत होणे असे घडते.

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून हवामानातील हा कल सातत्याने दिसून येतो आहे. गेल्या पाच वर्षांत पावसाचा पॅटर्न पूर्णपणे बदलला आहे. पावसाचा कालावधी कमी झाला आहे. थोड्या वेळातच अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. एक्स्ट्रीम स्पेल्समुळे शहरी भागात पूरस्थिती, वाहतूक विस्कळीत होणे असे घडते.

भारतीय हवामान विभाग आणि हवामान संशोधन संस्था आता या बदलत्या प्रणालींचा सखोल अभ्यास करत आहेत. क्लायमेट चेंजचा प्रभाव स्थानिक मॉन्सूनवर नेमका किती आणि कसा पडतो, हे शोधण्यासाठी पुढील काही वर्षांत अधिक तपशीलवार डेटा आवश्यक आहे, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली. जून-जुलै महिन्यांत पूर्वी जोरदार पाऊस होत असे. मात्र आता पावसाचा दुसरा टप्पा म्हणजेच ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर अधिक सक्रिय होत आहे. पावसाची सुरुवात उशिरा होत असून, तो उशिराच थांबतो. या पद्धतीत झालेला बदल हे हवामानातील व्यापक बदलांचे लक्षण आहे.  

शेतीवरही परिणामभारतामध्ये मान्सून पॅटर्नमध्ये दीर्घकालीन बदल दिसत आहेत. मान्सूनची सुरुवात उशिरा होते पण त्याची तीव्रता आणि कालावधी वाढला आहे. याचा परिणाम शेती, जलस्रोत व्यवस्थापन आणि शहरी नियोजनावर होणार आहे.हवामान बदलाचा सामना वैज्ञानिक दृष्टिकोनातून करावा लागेल. दीर्घकालीन डेटा, स्थानिक निरीक्षणे आणि ग्लोबल मॉडेल्स यांचा अभ्यास केल्याशिवाय बदलांचा नेमका परिणाम समजू शकणार नाही.

हवेतील आर्द्रतेत वाढ भारताच्या मान्सून प्रणालीवर तापमानातील १-२ अंश सेल्सियस वाढही मोठा परिणाम करू शकते. समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्याने हवेतील आर्द्रता वाढते आणि त्यामुळे पावसाचे स्वरूप अस्थिर होते. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. जे अनेकदा एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्सला कारणीभूत ठरतात.

सप्टेंबरमध्ये मुंबईत अतिरिक्त पर्जन्याची नोंदतापमानवाढ आणि मान्सून वाऱ्यांच्या प्रवाहात झालेला फरक ही त्यामागील प्रमुख कारणे मानली जात असून, सप्टेंबरमध्ये मुंबईत ६२० मिमी पावसाची नोंद झाली. जी सरासरीपेक्षा १७७ टक्के अधिक आहे. इतक्या मोठ्या फरकामुळे तज्ज्ञांनी याला अतिरिक्त पर्जन्य (एक्सेस रेनफॉल) अशी नोंद दिली आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली.

कमी दिवसांत जास्त धो धोतज्ज्ञांच्या मते, हवामानबदल हा या सर्वामागील मुख्य घटक आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरण जास्त आर्द्रता साठवू शकते. परिणामी, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो अल्पकाळात, पण अत्यंत तीव्रतेने पडतो. गेल्या पाच वर्षांपासून अशी पद्धत सातत्याने दिसून येत आहे. कमी दिवसांत जास्त पाऊस पडत आहे. सप्टेंबरमध्ये मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील अनेक भागांत काही तासांच्या मुसळधार पावसाने वाहतूक विस्कळीत झाली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Erratic Monsoon: Changing Patterns, Increased Rainfall Intensity Raise Concerns

Web Summary : Monsoon patterns are shifting, with shorter, intense bursts of rainfall causing urban flooding. Delayed starts and extended durations impact agriculture. Climate change, rising temperatures, and increased humidity are key factors, demanding scientific analysis for effective solutions.
टॅग्स :पाऊस