Join us
Daily Top 2Weekly Top 5

वचननाम्यात 'मराठी माणूस' नव्हे तर 'मुंबईकर', असं का? मराठी माणसासाठी कुठली वचन?; राज ठाकरेंनी तीनच वाक्यात सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 16:21 IST

महत्वाचे म्हणजे, शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे सेना भवनात आले...

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युती करून लढत असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपल्या पक्षांचा संयुक्त वचननामा आज प्रसिद्ध केला. मात्र, या वचननाम्यात 'मराठी' नव्हे तर 'मुंबईकर' असे उल्लेख बघायला मिळत आहेत. असे का? यासंदर्भात राज ठाकरे यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिले आहे. 'आम्हाला 'मुंबईकर' म्हणजे 'मराठी माणूस'च सांगायचं आहे,' असे राज यांनी म्हटले आहे. शिवसेना-मनसे युतीचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर दोन्ही ठाकरे पत्रकारांसोबत बोलत होते. महत्वाचे म्हणजे, शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे सेना भवनात आले. 

"आम्हाला 'मुंबईकर' म्हणजे 'मराठी माणूस'च सांगायचं आहे" -दरम्यान, ज्यावेळेला आपण हे म्हणतोय की, मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तुम्ही तो मुद्दा घेऊन पुढे जात असाल तर, या संपूर्ण वचन नाम्यामध्ये मराठी माणसासाठी अशी कुठली वचन आहेत? कारण त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळतायेत? असे विचारले असता, यावर उत्तर देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, "याचं कारण असं आहे की, हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडून मंजूर (Sanction) होऊन येतो. आम्हाला माहिती आहे आत्ताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे? आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचं आहे. परंतु मराठी माणूस यावर नामंजूर (Reject) झाला असता, म्हणून आम्ही मुंबईकर टाकले," असे राज ठाकरे म्हणाले. 

"...ती पुस्तिका त्यांनी नामंजूर केली" -यावर, म्हणजे, ही सगळी आश्वासनं मराठी माणसासाठी असतील असं मानायचं का? असे विचारले असता, उद्धव ठाकरे म्हणाले, "अहो साधी एक गोष्ट सांगतो, आम्ही केलेल्या कामाची एक पुस्तिका आणि त्यासंदर्भात आदित्यने डोममध्ये एक प्रेझेंटेशन दिले होते. त्याच्यानंतर कोरोना काळात केलेल्या कामाची एक पुस्तिका आम्ही केली. ती पुस्तिका त्यांनी नामंजूर केली. आता ते तर मी काय थांबणार नाही. ते तर पुस्तक मी बेधडकपणाने वाटणार, निवडणूक आयोगाला जे काय शब्द आहे, तो वापर करायचा ते करा. कारण ते काम आम्ही केलेलं आहे. त्या कामामध्ये जे जे सहभागी झाले सगळे मुंबईकर होते, सगळे महाराष्ट्र रहिवासी होते, नागरिक होते आणि ते काम आम्ही केलंय. निवडणूक आयोगाच्या परवानगीने आम्ही कोरोनाचं काम केलेलं नव्हतं. 

"निवडणूक आयोगाने ते अडवण्याची हिंमत दाखवावी" -त्याच्यामुळे कोरोना काळामध्ये जिथे उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेतं वाहत होती, त्या काळात मुंबई मॉडेल हे जगभरात गाजलं. अगदी त्या WHOच्या अध्यक्षांनीसुद्धा त्याची तारीफ केली, सर्वोच्च न्यायालयाने केली. न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलं. या कामाचं समाधान आहे की, त्यावेळेला आपण हे काम करू शकलो. चीनमध्ये पंधरा दिवसात फिल्ड हॉस्पिटल झालं आपल्या मुंबईमध्ये अठरा दिवसात झालं, हे आम्हीच सांगणार. याच्यामध्ये निवडणूक आयोग आला तरी त्याला बाजूला सारून आम्ही कोरोना काळात केलेलं काम हे सांगणार. निवडणूक आयोगाने ते अडवण्याची हिंमत दाखवावी.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Thackerays prioritize 'Mumbaikar' over 'Marathi Manus' in manifesto: Here's why.

Web Summary : Raj Thackeray clarifies the use of 'Mumbaikar' instead of 'Marathi Manus' in their manifesto due to Election Commission restrictions. Uddhav defends their Covid work, daring the EC to stop its dissemination.
टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेमुंबई महापालिका निवडणूक २०२६महानगरपालिका निवडणूक २०२६