नोकरशहा राजकारणात अपयशी का ठरतात?

By संदीप प्रधान | Published: March 5, 2019 07:08 PM2019-03-05T19:08:11+5:302019-03-05T19:10:54+5:30

'साहेब एक सांगतो. मी मनात आणले तर उर्वरित आयुष्यात मंत्री होऊ शकतो. मात्र तुम्ही कितीही ठरवले तरी आता आयसीएस (आताचे आयएएस) होऊ शकत नाही.'

Why do bureaucrats fail in politics? | नोकरशहा राजकारणात अपयशी का ठरतात?

नोकरशहा राजकारणात अपयशी का ठरतात?

googlenewsNext
ठळक मुद्देआता लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून काही नोकरशहा हे राजकारणाच्या आखाड्यात उडी ठोकतील. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सनदी अधिकारी श्रीनिवास पाटील हे राजकारणात यशस्वी झाले. मुंबईचे आणखी एक माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक हेही ओडिसातून येती निवडणूक लढवणार आहेत.

- संदीप प्रधान 

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात बाळासाहेब देसाई नावाचे एक मंत्री होते. त्या काळात एक सचिव होते स. गो. बर्वे. एकदा देसाई यांनी बर्वे यांना तातडीने आपल्या दालनात बोलावले. शिपाई निरोप घेऊन आला तेव्हा बर्वे यांच्याकडे सहसचिव, उपसचिव यांची बैठक सुरु होती. सुरु असलेली मिटींग आटोपून येतो, असा निरोप शिपायाकरवी बर्वे यांनी दिला. मिटींग संपायला उशिर झाला. जेव्हा बर्वे देसाई यांच्या दालनात शिरले तेव्हा त्यांचा पारा चढला होता. (बर्वे यांचा जातिवाचक उल्लेख करुन) देसाई म्हणाले की, माज चढलाय का? आम्ही बोलावल्यावर इतक्या उशिरा येता हे पुन्हा खपवून घेतले जाणार नाही. बर्वे यांनी उशिर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र, म्हणाले की, साहेब एक सांगतो. मी मनात आणले तर उर्वरित आयुष्यात मंत्री होऊ शकतो. मात्र तुम्ही कितीही ठरवले तरी आता आयसीएस (आताचे आयएएस) होऊ शकत नाही.

कालांतराने यशवंतराव चव्हाण यांनी बर्वे यांना राजकारणात आणले व ते निवडणुकीत विजयी झाले आणि अर्थमंत्री या नात्याने देसाई यांच्या मांडीला मांडी लावून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला बसले होते. मंत्री आणि सनदी अधिकारी यांचे नातेसंबंध स्पष्ट करणारा हा किस्सा बोलका आहे. उभयतांमधील संबंधात कालौघात काही फरक निश्चित पडला असेल. मात्र ‘आम्ही सत्ताधारी आहोत’ आणि ‘आम्ही नोकरशहा आहोत’, असा पिळ कायम आहे. त्यामुळेच बरेचदा मंत्री आणि त्यांच्या खात्याचे सचिव यांच्यात संघर्ष सुरु असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. 

आता लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून काही नोकरशहा हे राजकारणाच्या आखाड्यात उडी ठोकतील. मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह हे भाजपाच्यावतीने निवडणूक लढवतील, याची सूतराम कल्पना तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांना २०१४ मध्ये नव्हती. रातोरात राजीनामा देऊन सत्यपाल रिंगणात उतरले. यापूर्वी टी. चंद्रशेखर व रामाराम या दोन सनदी अधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशातून प्रजा राज्यम या चिरंजीवी यांच्या पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सनदी अधिकारी श्रीनिवास पाटील हे राजकारणात यशस्वी झाले. मुंबईचे आणखी एक माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक हेही ओडिसातून येती निवडणूक लढवणार आहेत.

प्रभाकर देशमुख, उत्तम खोब्रागडे, किशोर गजभिये, भाई नगराळे, विजय नहाटा आदी अनेक अधिकारी राजकारणात सक्रिय आहेत. 
मूळात राजकीय नेते व नोकरशहा यांच्यातील संघर्षाचे मूळ या दोन्ही पदांच्या मूळ गरजांमध्ये आहे. राजकीय नेते हे कधीच कुणाला ठाम नकार देत नाहीत आणि देऊ शकत नाहीत. लोकांना आश्वासनांची गाजरे दाखवत राहणे हा राजकीय नेत्यांचा स्थायी भाव आहे तर नोकरशहांनी कधीच कुणाला लागलीच होकार द्यायचा नसतो. कुठलीही मागणी, प्रस्ताव हा व्यवस्थित तपासून पाहिल्यावर व त्याच्या वित्तीय तरतुदीची खातरजमा केल्यावरच होकार देणे हे नोकरशहांचे काम असते. त्यामुळेच काही नोकरशहांवर राजकीय नेते ‘नकारात्मक भूमिकेचे’ असल्याचा शिक्का मारतात तर काहीवेळा एखादा विषय टाळायचा असेल तर सचिवांना नकारात्मक भूमिका मांडायला भाग पाडतात.

सर्वसाधारणपणे नोकरशहा चार पद्धतींचे असतात १) अत्यंत कर्तबगार व प्रामाणिक, २) अत्यंत कर्तबगार पण भ्रष्ट, ३) अत्यंत कामचुकार पण प्रामाणिक, ४) अत्यंत कामचुकार आणि अत्यंत भ्रष्ट. या चार श्रेणीपैकी पहिला श्रेणीतील अधिकारी हे कुठल्याही खात्यात आपल्या कामाची छाप सोडतात, मात्र ते प्रामाणिक असल्याने काहीवेळा राजकीय नेत्यांना त्यांची गैरसोय वाटते. सर्वात शेवटच्या म्हणजे चवथ्या श्रेणीतील नोकरशहा हे राजकारण्यांना डोकेदुखी ठरतात. बरेचदा पक्षातील आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करायला, त्याला नालायक ठरवायला असे कामचुकार व भ्रष्ट नोकरशहा त्याच्या खात्यात नियुक्त केले जातात.

तिस-या श्रेणीतील कामचुकार पण प्रामाणिक नोकरशहा हे राजकीय नेत्यांना अडचणीचे वाटतात कारण ते स्वत: काही करीत नाहीत आणि त्यांना त्यांचे ‘इप्सित’ साध्य करु देत नाहीत. राजकारण्यांना सर्वात प्रिय हे दुस-या श्रेणीतील नोकरशहा असतात. जे कर्तबगार आहेत आणि भ्रष्टाचाराचे त्यांना वावडे नाही. असे नोकरशहा हे राजकीय नेत्यांच्या गळ््यातील ताईत बनतात. राजकारणात वरील चार श्रेणीतील दुसºया श्रेणीतील नोकरशहाच यशस्वी होऊ शकतात. कारण राजकारणात कामचुकारपणाला काडीमात्र थारा असत नाही. राजकारणात टायमिंगला फार महत्त्व असल्याने योग्य वेळी योग्य निर्णय व योग्य कृती फार गरजेची असते. त्याचप्रमाणे राजकारणात अत्यंत प्रामाणिक माणसाची डाळ शिजू शकत नाही. स्पष्टवक्तेपणा हा राजकारणात दुर्गुण आहे. प्रामाणिक नोकरशहांच्या ठायी अहंकार असतो.

आजूबाजूचे काही नोकरशहा ही त्याची चालतीबोलती उदाहरणे असून त्यांचे कुणाशीच पटत नाही. त्यामुळे त्यांच्या सतत बदल्या केल्या जातात. तसाही नोकरशाहीला आपण देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालो असल्याचा अहंगंड असतो. अनेक कोर्टकज्ज्यात न्यायमूर्ती नोकरशाहीवर ताशेरे ओढतात. तातडीने नोकरशहांना न्यायालयात हजर राहायला भाग पाडतात. योग्य वेळी प्रतिज्ञापत्र केले नाही म्हणून टिप्पणी करतात. त्यामुळे नोकरशहा व न्यायमूर्ती यांच्यातही एक सुप्त संघर्ष आहेच. मागे एका उपसचिवांनी एका प्रतिज्ञापत्राचा मसुदा तयार करुन एका वरिष्ठ सनदी अधिका-यासमोर ठेवला. त्यामध्ये न्यायमूर्तींच्या नावाअगोदर ‘सन्माननीय न्यायमूर्ती’ असे लिहिले होते. त्या सनदी अधिका-याने आपल्या पेनाने ‘सन्माननीय’ या शब्दावर काट मारली.

प्रतिज्ञापत्राचा मसुदा अंतिम करुन त्या उपसचिवाच्या हाती ठेवताना ते वरिष्ठ सनदी अधिकारी म्हणाले की, या देशातील सर्वात कठीण परीक्षा आम्ही उत्तीर्ण झालो आहोत. त्यामुळे सर्वाधिक ‘सन्माननीय’ आम्ही आहोत याचा यापुढे विसर पडू देऊ नका. तात्पर्य हेच की, नोकरशाहीला आपल्या आयएएस असण्याचा अभिमान असतो. अनेकदा राजकारणातील मंडळी ही रिक्षाचालक, डोअरकिपर, लिफ्टमन वगैरे हलकीसलकी कामे करणारी असतात. त्यांचे लौकीकार्थाने शिक्षण फार झालेले नसते. मात्र राजकारणात टक्केटोणपे खात आणि माणसे वाचत ती बरेच काही शिकलेली असतात. एखादा निर्णय घेण्यावर ती ठाम असतात. तो नियमाच्या चौकटीत कसा बसवायचा ते नोकरशाहीवर सोडून ते मोकळे होतात. फारच मोजकी राजकीय नेते मंडळी अमूक एक निर्णय कोणत्या नियमात कसा बसवता येईल हे स्वत: नोकरशाहीला सांगतात. अशा राजकीय नेत्यांना नोकरशहा कायम वचकून असतात.

हल्ली नोकरशहांच्या तालावर चालण्याचा काळ असल्याने मंत्री दुबळे झाले आहेत. मात्र नोकरशहांनी राजकारणात प्रवेश केल्यावर पक्षातील ज्येष्ठतेमुळे अशा लौकीकार्थाने शिक्षण न झालेल्या राजकीय नेत्यांच्या हाताखाली काम करण्याची तयारी नोकरशहांना ठेवावी लागते. कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे रहावे लागते. रात्री-अपरात्री पोलीस स्टेशनला जावे लागते. आपण सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाच उपलब्ध आहोत व त्यानंतर आपण टेनिस खेळतो, क्लबमध्ये पत्ते कुटतो, कुणाचाही फोन उचलत नाही, असा हेका सोडावा लागतो. किंबहुना राजकारणात तडजोडी कराव्या लागतात, अपमान गिळावा लागतो. वेळप्रसंगी लाचारी, खुषमस्करेगिरी वगैरे करावी लागते. या सा-याची तयारी असणारे नोकरशहाच राजकारणात यशस्वी होऊ शकतात. अन्यथा राजकारणाच्या वेशीला हात लावून परतलो एवढाच आनंद नोकरशहांना मिळतो.    

 

Web Title: Why do bureaucrats fail in politics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.