BMC Election 2026: ‘मुंबादेवी’मध्ये कौल कुणाला? पाचही प्रभागांत अल्पसंख्याक समाजाची मते ठरणार निर्णायक; ‘काँटे की टक्कर’ अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:34 IST2025-12-29T16:34:34+5:302025-12-29T16:34:51+5:30
Mumbai Mahanagarpalika Election 2026: २०१७ च्या पालिका निवडणुकीत पाचपैकी तीन प्रभागांत काँग्रेसचे, तर दोन प्रभागांत भाजपचे उमेदवार निवडून आले होते. विधानसभेत येथून गेली १५ वर्षे काँग्रेसचे अमीन पटेल नेतृत्व करत आहेत. त्यामुळे या भागात काँग्रेसचे वर्चस्व आहे.

BMC Election 2026: ‘मुंबादेवी’मध्ये कौल कुणाला? पाचही प्रभागांत अल्पसंख्याक समाजाची मते ठरणार निर्णायक; ‘काँटे की टक्कर’ अपेक्षित
सुजित महामुलकर -
मुंबई : मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील पाचही प्रभाग मुस्लिमबहुल आहेत. येथे भाजप-शिंदेसेनेची महायुती तसेच ठाकरे बंधूंना मतांसाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. काँग्रेस स्वतंत्र लढत असल्याने मुंबादेवीत ‘काँटे की टक्कर’ होण्याची चिन्हे आहेत.
२०१७ च्या पालिका निवडणुकीत पाचपैकी तीन प्रभागांत काँग्रेसचे, तर दोन प्रभागांत भाजपचे उमेदवार निवडून आले होते. विधानसभेत येथून गेली १५ वर्षे काँग्रेसचे अमीन पटेल नेतृत्व करत आहेत. त्यामुळे या भागात काँग्रेसचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत भाजप आणि एकसंध शिवसेना वेगवेगळे लढले होते. तेव्हा २२० मधून अतुल शाह आणि २२१ मधून आकाश पुरोहित हे भाजपचे उमेदवार निवडून आले. आकाश हे माजी आमदार राज पुरोहित यांचे पुत्र आहेत. भाजपचे माजी नगरसेवक जनक संघवी त्यांचे प्रतिस्पर्धी होते. संघवी यांचा पत्ता कट झाल्याने त्यांनी काँग्रेसमधून उमेदवारी मिळवली.
३५ टक्के मतदार गुजराती, व्यापारी समाजातील
मूळचे भाजपवासीय असलेल्या संघवी यांना स्थानिक जनतेने स्वीकारले नाही, तर राज पुरोहित यांनी निवडणूक प्रतिष्ठेची करत आकाश यांना निवडून आणले. पराभव झाल्यानंतर संघवी पुन्हा स्वगृही परतले.
यावेळी त्यांनी कुलाबा विधानसभा मतदारसंघातील २२२ क्रमांकाच्या त्यांच्यासाठी सुरक्षित प्रभागातून प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रभागात ३५ टक्के मतदार गुजराती व व्यापारी समाजातील आहेत.
यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन गट पडले असले तरी भाजप आणि शिंदेसेना महायुती आहे, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस
आणि उद्धवसेना स्वतंत्र लढत आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आहे.

महापालिकेचे प्रभाग आणि मतदार संख्या
प्रभाग महिला पुरुष इतर एकूण
२१३ २३,३७६ २७,१५८ ७ ५०,५४१
२१६ २१,२४५ २३,८८६ २ ४५,१३३
२२० २०,७१० २६,७६० १ ४७,४७१
२२१ १९,०९१ ३०,०५४ ० ४९,१४५
२२३ २२,६८२ २४,२२४ ० ४६,९०६
भाजपला मिळाली ईश्वरचिठ्ठीची साथ
२२० क्रमांकाच्या प्रभागामध्ये भाजपचे माजी आमदार अतुल शाह निवडणूक रिंगणात होते आणि एकसंध शिवसेनेकडून माजी बेस्ट समिती अध्यक्ष सुरेंद्र बागलकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. त्यात दोघांना समसमान मते (५,९४६) मिळाली. अखेर ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली आणि नशिबाने शाह यांना साथ दिली. तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या नरेश शेठ यांना ५,३५८ मते मिळाली होती.