Join us  

थिंक टँकमध्ये मुख्याध्यापक, पालकच नसतील; तर समस्या मांडणार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 4:25 AM

मुख्याध्यापकांचा सवाल

मुंबई : राज्यातील शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने थिंक टँक (चिंतन गट) स्थापन केला. त्यासाठी विविध क्षेत्रांतील ज्ञान, अनुभव, कौशल्य असलेल्या व्यक्तींची निवड केली. त्यांची बैठक शनिवारी आहे. मात्र ३२ जणांच्या समितीत मुख्याध्यापक, खासगी प्रशाळेतील शिक्षक आणि पालक प्रतिनिधी यांचा समावेश नसल्याने या वर्गात प्रचंड नाराजी आहे.शालेय स्तरावरील प्रतिनिधींची बाजूच मांडली जाणार नसेल तर या चिंतन गटाचा आणि याद्वारे शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी कसा उपयोग होईल, असा प्रश्न मुख्याध्यापक विचारत आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढावी यासाठी राज्याचा स्वत:चा पॅटर्न तयार केला जाईल, असे जाहीर केले आहे.शुल्क समिती, शुल्क रचना, भरती प्रक्रिया, शिक्षकांची गुणवत्ता आदींमधील समस्या सोडविण्यासाठी आधी त्या समजून घेणे व त्या सोडविण्यासाठी थिंक टँक म्हणजेच चिंतन गटाची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक संस्थेत कार्य करणारे तज्ज्ञ, अभ्यासक, शिक्षक, पालक या साऱ्यांचा समावेश असेल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात समितीची नावे जाहीर केल्यानंतर त्यामध्ये एकही मुख्यध्यापक प्रतिनिधी किंवा पालक प्रतिनिधी नसल्याचे समोर आले आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात नाराजी आहे.शाळापातळीवर काम करणाऱ्यांची बाजूच मांडली जाणार नसेल तर शिक्षण क्षेत्रात अनागोंदी निर्माण होईल. यासंदर्भात बिगर राजकीय शिक्षक, पालक संघटना, व मुख्याध्यापक संघटना यांची एकत्रित बैठक बोलावून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले. त्यामुळे थिंक टँकच्या संकल्पनेला मुख्याध्यापक, पालकांचा सहकार लाभणार की विरोध होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

टॅग्स :शाळाशिक्षण