मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कोण? अश्विनी भिडे, खारगे, मुखर्जी, व्ही. राधा यांची नावे चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 06:10 IST2026-03-27T06:10:09+5:302026-03-27T06:10:09+5:30
अश्विनी भिडे यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली तर मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अशा दोन्ही पदांवर नवीन नियुक्ती करावी लागणार आहे.

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कोण? अश्विनी भिडे, खारगे, मुखर्जी, व्ही. राधा यांची नावे चर्चेत
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी ३१ मार्च रोजी निवृत्त होत असून त्यांच्या जागी नवे आयुक्त कोण होणार, याबाबत उत्सुकता आहे. मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची नावे चर्चेत आहेत.
अश्विनी भिडे या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य आयुक्त आणि मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. अत्यंत कार्यक्षम अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. व्ही. राधा यांनी प्रशासकीय सुधारणांसंदर्भात अलिकडील काही महिन्यांमध्ये मोठे काम केले आहे. विकास खारगे यांचा लौकिक अत्यंत प्रामाणिक अधिकारी असा आहे. डॉ. संजय मुखर्जी हे गतिमान कारभारासाठी ओळखले जातात.
अश्विनी भिडे यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली तर मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अशा दोन्ही पदांवर नवीन नियुक्ती करावी लागणार आहे. सूत्रांनी सांगितले, सध्याचे आयुक्त भूषण गगराणी यांना तीन महिने मुदतवाढ मिळणार अशी चर्चा होती, पण मुदतवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवलेला नाही.
काय असणार निकष ?
मुंबई महापालिकेत भाजप-शिंदेसेनेची सत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेचा कारभार कशा पद्धतीने चालला पाहिजे याचा 'रोड मॅप' निश्चित केला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने योग्य अधिकारी कोण यावरच नवीन आयुक्त ठरतील, असे म्हटले जाते. प्रामाणिकपणा आणि गतिमानता या दोन्ही निकषांवर आयुक्तपदाचा नवा चेहरा मुख्यमंत्री देतील.
मुंबई महापालिकेत शिंदेसेना हा भाजपचा मित्र आहे. शिवाय नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबरच शिंदे यांना मान्य असेल अशा अधिकाऱ्याला संधी दिली जाऊ शकते.
दुसरीकडे आता लवकरच महत्त्वाच्या पदांवरील आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येने बदल्या होण्याची शक्यता आहे. मोठे प्रशासकीय बदल त्या निमित्ताने बघायला मिळतील.