मुंबई : विधानसभेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन शनिवार, ७ डिसेंबरपासून सुरू होणार असून सोमवारी, ९ डिसेंबरला नवीन विधानसभाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नऊवेळचे आमदार कालिदास कोळंबकर यांना राज्यपालांनी शुक्रवारी शपथ दिली. त्याचप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ११ किंवा १२ डिसेंबरला होण्याची शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
कोळंबकर हे भाजपचे आमदार असून ते नवव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या तीन दिवसांच्या अधिवेशनात नवीन आमदारांना शपथ दिली जाईल. आधीचे दोन दिवस विधानसभेचे अधिवेशन असेल. ९ डिसेंबरला विधान परिषदेचेही कामकाज होईल. संयुक्त सभागृहात राज्यपालांचे अभिभाषण होईल.
कसा असेल मंत्रिमंडळ विस्तार?
मंत्रिमंडळाच्या विस्तारात विभागीय आणि जातीय संतुलन साधण्याचा • महायुतीतील तिन्ही पक्ष प्रयत्न करतील. जुन्या मंत्र्यांचा पत्ता सरसकट कापला जाणार नाही. मात्र, काही चेहरे वगळले जातील. भाजपला २० ते २२, शिंदेसेनेला १२ ते १३ आणि अजित पवार गटाला ९ ते १० मंत्रिपदे दिली जातील, अशी शक्यता आहे.
शिंदेसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांना सांगितले की, मंत्रिमंडळ विस्तार ११ किंवा १२ डिसेंबरला होईल, असे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
विस्तारात कोणाकोणाचे समाधान करायचे हा प्रश्न तिन्ही पक्षांसमोर ३ असेल. महायुतीचे २०२२ मध्ये सरकार आले तेव्हापासून मंत्रिपदाची वाट पाहत असलेल्या शिंदेसेनेतील आमदारांना यावेळी संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.
भाजपचा विचार करता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री झाले तर प्रदेशाध्यक्ष कोण होणार हे महत्त्वाचे असेल. १३२ आमदार असलेल्या भाजपमध्ये मंत्रिपदे देताना पक्षनेतृत्व आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची कसोटी लागणार आहे.
कॅबिनेटमध्ये शिंदे नंबर २, देवगिरीवर असेल मुक्काम
नागपूर : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री क्रमांक २वर असतील. त्यांना नागपुरात देवगिरी बंगला देण्यात आला आहे, तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुक्काम 'विजयगड' बंगल्यावरच राहणार आहे. शपथविधीनंतर मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकावर कोण असणार, याकडेही लक्ष लागले होते. यावरील पडदा गुरुवारी सकाळीच हटविण्यात आला.
अध्यक्षांची निवड होईपर्यंत हंगामी अध्यक्ष कोळंबकर हे कामकाज पाहतील. राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्षपद भाजपकडेच राहणार, यांचीही नावे चर्चेत विधानसभा अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, सुभाष देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. अध्यक्षपद हे भाजपकडेच जाणार आहे. नार्वेकर यांचे नाव आघाडीवर आहे.
विरोधी पक्षनेत्याचा निर्णय कोण घेणार?
■ विधानसभेच्या एकूण आमदार- संख्येच्या (२८८) १० टक्के म्हणजे २८ किंवा त्यापेक्षा जास्त आमदार निवडून आले असतील अशा पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद जाते. यावेळी महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षाला इतक्या जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेताच नसेल, अशी स्थिती आहे.
■ विरोधी पक्षनेतेपद असावे की नाही याचा निर्णय करण्याचा अधिकार हा विधानसभाध्यक्षांना असतो. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले होते. या तीन दिवसांच्या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेता असावा की नाही, याबाबत निर्णय होणार नाही, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.