''केंद्रातील भाजपा सरकारला सावरकरांना 'भारतरत्न' देण्यापासून कोणी रोखले?"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 09:24 AM2019-12-18T09:24:02+5:302019-12-18T09:24:10+5:30

गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून जोरदार रणकंदन सुरू आहे. राहुल गांधी यांनी मी माफी मागायला सावरकर नाही,

"Who stopped the BJP government at the Center from giving Bharat Ratna to Savarkar?" | ''केंद्रातील भाजपा सरकारला सावरकरांना 'भारतरत्न' देण्यापासून कोणी रोखले?"

''केंद्रातील भाजपा सरकारला सावरकरांना 'भारतरत्न' देण्यापासून कोणी रोखले?"

Next

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून जोरदार रणकंदन सुरू आहे. राहुल गांधी यांनी मी माफी मागायला सावरकर नाही, असं म्हटल्यानं या वादाला फोडणी मिळाली आहे. त्यानंतर शिवसेनेनंही आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सावरकरांच्या बाबतीतील आमच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. त्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपाला लक्ष्य करण्यात आलं आहे.  

वीर सावरकर हे क्रांतिकारकांचे शिरोमणी होतेच. प्रश्न इतकाच आहे की , गेली साडेपाच वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे. ' भारतरत्न ' देऊन सावरकरांचा सन्मान करण्यासाठी त्यांना कोणी रोखले होते ?, असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे. सावरकरांना 'कलंक' आणि 'माफीवीर' म्हणून हिणवणारी 'आयात' मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपच्याच बाकावर बसली आहेत. त्यांचे तुम्ही काय करणार आहात?, महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग असा सगळा तुमचा प्रकार आहे. सावरकरांबाबत नक्राश्रू ढाळण्यापेक्षा नागरिकता सुधारणा विधेयकावरून देश का पेटला , याचे उत्तर आधी जनतेला द्या, असंही म्हणत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे. 

सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे

- नागरिकता सुधारणा विधेयकाचे महाराष्ट्रात काय करणार, असा प्रश्न राज्यातील विरोधी पक्षाला पडला आहे. हातातून सत्ता गेली. हातातोंडाशी आलेला घास गेला. 

- अशा ताणतणावात असले प्रश्न पडतात. अर्थात महाराष्ट्रापुढे यापेक्षाही महत्त्वाचे आणि लोकांच्या जीवनमरणाचे प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. 

- नागरिकता सुधारणा कायद्यावरून देशात भडका उडाला आहे व प्रकरण केंद्र सरकारच्या हाताबाहेर गेले आहे. ईशान्येकडील राज्यांत आग लागली आहेच, पण बिहार, लखनौसह इतर राज्यांतही पेटवापेटवी सुरू झाली आहे. 

- राजधानी दिल्लीत तर सगळ्यात जास्त तणावाचे वातावरण दिसत आहे. विधेयकाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या जामिया मिलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बंदुका रोखल्या. 

- गोळ्या चालवल्या. आपल्याच देशातील विद्यार्थ्यांवर बंदुका रोखण्याची वेळ येते तेव्हा प्रकरण हाताबाहेर गेले असे समजावे. दिल्लीतील पोलिसांची कारवाई अमानुष आणि बेकायदेशीर आहे. 

- जालियनवाला बाग हत्याकांडात इंग्रज यापेक्षा वेगळे वागले नव्हते. 1984च्या शीख हत्याकांडावर बोलण्याचा अधिकार आता भाजपास उरला आहे काय? 

- नागरिकता सुधारणा विधेयकावरून देशभरात जो हिंसेचा भडका उडाला आहे त्याबाबत पंतप्रधानांनी नेहमीप्रमाणे शांततेचे आवाहन केले आहे व या भडक्यामागे पाकिस्तानचे डोके आणि हात असल्याचे जाहीर केले आहे. 

- असे सांगणे ही मोदी सरकारची हतबलता आहे. एका महाशक्तिमान देशात पाकिस्तानसारखा कमजोर देश अशाप्रकारे दंगेधोपे घडविण्याचे सामर्थ्य राखत असेल तर हिंदुस्थानला ते शोभणारे नाही. 

- एका बाजूला सांगायचे, 'सर्जिकल स्ट्राइक' वगैरे करून आम्ही पाकिस्तानला खतम केले, गुडघे टेकायला लावले व त्याच वेळी देशात भडका उडाला त्याचे खापर पाकिस्तानवर फोडायचे, हे पटणारे नाही. 

- पाकिस्तान हिंदुस्थानात काही गडबड करीत असेल तर त्यांना जन्माची अद्दल घडवणे हाच एकमेव मार्ग दिसतो. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे दुर्लक्ष करणे अशानं काय साध्य होणार? 

- पण अशा बाळबोध आंतरराष्ट्रीय कूटनीतीतच आपण रमलो आहोत व भक्तांना त्याच शौर्यकथा वाटत आहेत. देशात नागरिकता सुधारणा विधेयकावरून रण पेटले असतानाच भाजपाने वीर सावरकर यांच्या अपमानाचा मुद्दाही काढला. 

- सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या कोटास गुलाबाचे फूल खोचावे व मिरवावे तसे तुम्ही त्यांना मिरवत आहात. त्यामुळेच तुमचे सावरकरप्रेमाचे ढोंग साफ उघडे पडले आहे. 

- महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग असा सगळा तुमचा प्रकार आहे. सावरकरांबाबत नक्राश्रू ढाळण्यापेक्षा नागरिकता सुधारणा विधेयकावरून देश का पेटला, याचे उत्तर आधी जनतेला द्या. 

- महाराष्ट्रात आधीच्या सरकारने प्रश्नांचे डोंगर उभे केले आहेत. अरबी समुद्रातील शिवस्मारकातील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाले आहे. 

- अशी अनेक प्रकरणे रटरटत आहेत. त्यावरून लोकांचे लक्ष उडावे म्हणून विरोधी पक्ष फालतू उपद्व्याप करू पाहत असेल तर हे उद्योग त्यांच्या अंगलट येतील. विरोधी पक्षाने विधायक दृष्टिकोन ठेवावा. 

- विरोधकांच्या कुंडल्या आमच्या हातात आहेत अशा धमक्या देणाऱ्यांपैकी उद्धव ठाकरे नाहीत. अशा धमक्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. 

- महाराष्ट्रातले हे वातावरण संपले आहे. नागरिकता सुधारणा बिलाचे काय करावे त्याचे मार्गदर्शन विरोधकांकडून घेण्याची गरज नाही. 

- भीमा-कोरेगाव दंगलीत फडणवीस यांचे सरकार कसे हतबल झाले होते याचा अनुभव देशाने घेतला आहे. महाराष्ट्राची नवी कुंडली महाविकास आघाडीचे सरकार मांडत आहे. विरोधकांनी त्यात अडथळे आणू नयेत. 

- नागरिकता सुधारणा विधेयकापेक्षा आम्हाला महाराष्ट्राच्या 11 कोटी नागरिकांची चिंता आहे. विरोधकांना हे मान्य नसेल व ते रिकामे असतील तर त्यांनी इतर राज्यांत लागलेली आग विझवायला जावे. आम्ही बंब पुरवू.

Web Title: "Who stopped the BJP government at the Center from giving Bharat Ratna to Savarkar?"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.