Join us  

सनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण?, अशोक चव्हाण यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 7:10 PM

सनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.

मुंबई  -  कर्नाटक सरकारच्या विशेष तपास पथकाने गौरी लंकेश हत्या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात सनातन संस्थेचे नाव आरोपी म्हणून घेतले आहे. यातूनच सनातन संस्था ही अत्यंत घातक संस्था असून हिंसक कारवायांमध्ये गुंतलेली आहे, या वस्तुस्थितीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या अगोदरही या संदर्भातील अनेक पुरावे समोर आले असतानाही सनातन संस्थेवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे सनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.

या संदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी सनातन संस्थेशी संबंधित आहेत आणि सनातन संस्थेने इतर कट्टरवादी संघटनांच्या मदतीने ही हत्या घडवून आणली असा स्पष्ट उल्लेख कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात आहे. तसेच नरेंद्र दाभोलकर, एम. एन. कलबुर्गी व डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडाशीही सनातन संस्थेचा संबंध आहे. हे ही यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालावी या मागणीचा खा. चव्हाण यांनी पुनरूच्चार केला.  

या अगोदरही मुंबईजवळ नालासोपारा येथे सनातनच्या साधकाकडे जिवंत बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणा-या साहित्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सनातनच्या काही साधकांना अटकही करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने आरोपींचा मोठ्या प्रमाणात घातपात करण्याचा कट होता. हे स्पष्ट झाले असतानाही सरकारने सनातनवर कोणतीही कारवाई केली नाही. २००८ साली गोव्यात झालेल्या बॉम्बस्फोटात समातनच्या साधकांचा हात होता. हे इंडिया टुडे या वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून समोर आणले. तरीही या प्रकऱणी सनातन संस्थेची साधी चौकशी करण्याची तसदीही सरकारने घेतली नाही. कर्नाटक सरकारने या प्रकरणात चौकशी केली नसती तर सत्य समोर आले नसते. या प्रकरणातील महाराष्ट्र सरकारची भूमिका पूर्णपणे संशयास्पद आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले

टॅग्स :अशोक चव्हाणसनातन संस्थामहाराष्ट्र सरकार