Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉरेन्सशी थेट संबंध, २२ जणांची टोळी अन्...; बाबा सिद्दींकीच्या हत्येच्या मुख्य सुत्रधाराचे सत्य समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 12:03 IST

बाबा सिद्दीकींची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या झिशान अख्तर याच्याबाबत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने महत्त्वाचा खुलासा केला आहे.

Baba Siddiqui Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईत तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोळीबारात सिद्दीकी यांच्या पोटात आणि छातीत गोळी लागली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी करनैल सिंग आणि धर्मराज कश्यप नावाच्या दोघांना अटक केली. तर तिसरा आरोपी शिवकुमार अद्याप फरार आहे. आता या प्रकरणात गुन्हे शाखेने चौथा आरोपी झिशान अख्तर याची ओळख पटवली आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचा कट झिशान अख्तर यानेच कट रचल्याचे समोर आलं आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील चौथा आरोपी मोहम्मद झिशान अख्तर हा पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील नकोदर येथील आकार गावचा रहिवासी असल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने शिवा आणि झिशान अख्तरचा शोध सुरू केला आहे. झीशान अख्तर बाहेरून तिन्ही शूटर्सना सूचना देत होता, असे सांगण्यात येत आहे. झिशाननेच बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाची माहिती शूटर्सना दिली होती. यासोबतच मोहम्मद झिशानने आरोपींसाठी भाड्याने खोली घेण्यासोबत अनेक गोष्टींमध्ये मदत केली होती.

मुंबईत हल्लेखोरांची केली मदत

दोन वर्षांपूर्वी मोहम्मद झिशान अख्तरला स्थानिक पोलिसांनी अटक केली होती.  पतियाळा तुरुंगात असताना त्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्यांची भेट घेतली होती. सुटका झाल्यानंतर तो मुंबईला गेला. झिशान अख्तर हा जालंधरच्या नकोदर येथील आकार गावचा रहिवासी होता. त्याला २०२२ मध्ये संघटित गुन्हेगारी, खून आणि दरोड्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. जिथे तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात आला. येथूनच त्याला बाबा सिद्दीकी यांना मारण्याचे आदेश मिळाले होते. जूनमध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर झिशान अख्तर गुरमेलला भेटण्यासाठी कैथलला पोहोचला होता. त्यानंतर हल्लेखोरांसह त्याने मुंबई गाठली होती. बाबा सिद्दिकींवर गोळीबार झाल्यानंतर झिशान अख्तर फरार झाला आहे. तो अजूनही मुंबईत लपून बसल्याचे म्हटलं जात आहे. त्याच्या शोधासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत.

लॉरेन्स गँगशी थेट संबंध

दुसरीकडे, फरार असलेल्या झिशान अख्तरचे लॉरेन्स गँगशी थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे. झिशानच्या डॉजियरमध्ये लॉरेन्स गँगच्या सौरव महाकालचे नावही आहे. पंजाबमधील सिद्धू मूसेवाला हत्याकांडात सौरव महाकालचे नावही समोर आले होते. सौरव महाकाळ हा लॉरेन्स गँगचा सक्रिय सदस्य असून तो अनमोल बिश्नोईचा खास सहकारी आहे. झिशानचे खरे नाव मोहम्मद यासीन अख्तर आहे. लोक त्याला जुल्मी उर्फ ​​जेसी उर्फ ​​जस्सी उर्फ ​​सिकंदर या नावाने देखील ओळखतात. झिशानच्या टोळीत २२ हून अधिक सदस्य आहेत. त्याच्यावर खून, दरोडा, खंडणी असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. 

विक्रम ब्रारसाठी केलं काम

झिशान अख्तर कुख्यात गुंड विक्रम ब्रारच्याही संपर्कात होता, जो बराच काळ लॉरेन बिश्नोईचा जवळचा सहकारी होता. विक्रम ब्रार हा राजस्थानच्या हनुमानगडचा असून त्याला गेल्या वर्षी यूएईमधून भारतात आणण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी झिशानच्या कुटुंबीयांवर हल्ला झाला होता. त्याचा सूड घेण्यासाठी विक्रम ब्रारने त्याला मदत केली होती. त्यानंतर विक्रम ब्रारने झिशानला पंजाबमध्ये काही टार्गेट देण्यात आले होते. झिशानने विक्रम ब्रारसाठी पंजाबमध्ये काही गोळीबाराच्या घटना घडवून आणल्या होत्या.

टॅग्स :बाबा सिद्दिकीमुंबई पोलीसगुन्हेगारी