मुंबई महापालिकेचा महासंग्राम आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे लागून राहिलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातील ७ प्रभागांचा फैसलाही आज होणार आहे. आदित्य ठाकरे यांचा हा बालेकिल्ला शाबूत राहणार की शिंदे-भाजप युती इथे सर्जिकल स्ट्राईक करणार, याची धाकधूक वाढली आहे. आज, शुक्रवार १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून १४ टेबलांवर मतमोजणीला सुरुवात झाली असून, केवळ ४ ते ८ राऊंडमध्ये वरळीचा नवा निकाल स्पष्ट होणार आहे.
वरळीत 'शिवसेना विरुद्ध शिवसेना' थेट संघर्ष
वरळीत यंदा केवळ निवडणूक नाही, तर अस्तित्वाची लढाई आहे. गिरणी कामगार, बीडीडी चाळकरी आणि कोळी बांधवांच्या या पट्ट्यात मराठी मतांचे विभाजन टाळण्याचे मोठे आव्हान ठाकरेंसमोर आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपने या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी स्थानिक दिग्गज चेहरे रिंगणात उतरवून ठाकरेंची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे.
'या' ७ प्रभागांकडे सर्वांचे लक्ष:
१. वॉर्ड १९९: माजी महापौर किशोरी पेडणेकरांची प्रतिष्ठा पणाला
येथे माजी महापौर किशोरी पेडणेकर (ठाकरे गट) आणि रुपल राजेश कुसळे (शिंदे गट) यांच्यात काट्याची टक्कर आहे. राजेश कुसळे २३ वर्षे शाखाप्रमुख राहिल्याने त्यांचे या भागात मोठे प्रस्थ आहे. धोबी घाट आणि चाळ पुनर्विकासाचा मुद्दा कोणाच्या पथ्यावर पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
२. वॉर्ड १९३: कोळीवाड्यात बंडखोरीचा फटका?
माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर (ठाकरे गट) यांच्यासमोर शिंदे गटाचे प्रल्हाद वरळीकर यांचे आव्हान आहे. मात्र, १५ वर्षे शाखाप्रमुख राहिलेले सूर्यकांत कोळी यांनी अपक्ष उडी घेतल्याने येथे तिरंगी लढत होत आहे. कोस्टल रोड प्रकल्पामुळे स्थानिक कोळी बांधवांची नाराजी कोणाला भोवणार?
३. वॉर्ड १९६: सर्वाधिक चुरशीची लढत!
या प्रभागात तब्बल ६ उमेदवार रिंगणात आहेत. २५ वर्षे नगरसेवक राहिलेल्या आशिष चेंबूरकर यांच्या पत्नी पद्मजा चेंबूरकर (ठाकरे गट) यांच्यासमोर भाजपच्या सोनल सावंत आणि दोन तगड्या अपक्ष उमेदवारांचे आव्हान आहे. ७०% मराठी मतदार असलेल्या या प्रभागात बंडखोरी कोणाचे स्वप्न भंग करणार?
४. वॉर्ड १९७ आणि १९८: पुनर्विकासाचा तिढा
वॉर्ड १९७ मध्ये वनिता नरवणकर (शिंदे गट) आणि श्रावणी देसाई (ठाकरे गट बंडखोर) यांच्यातील लढत रंजक आहे. तर वॉर्ड १९८ मध्ये संपूर्ण मराठी मतदार असून अबोली खाड्ये (ठाकरे गट) आणि वंदना गवळी (शिंदे गट) यांच्यात डिलाईल रोडच्या पुनर्विकासावरून सामना रंगला आहे.
५. वॉर्ड १९५: भाजपचा 'राजेश' की ठाकरेंचा 'विजय'?
अप्पर वरळी आणि लोअर परळच्या या भागात भाजपचे राजेश कांबळे आणि ठाकरेंचे विजय भणगे आमनेसामने आहेत. येथे ९ हजार तेलगू भाषिक मते निर्णायक ठरू शकतात, ज्यावर भाजपची नजर आहे.
वरळीतील मतमोजणीची सुरुवात १९३ आणि १९४ प्रभागापासून होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर प्रभागांचे निकाल हाती येतील.
Web Summary : Worli witnesses a crucial battle between Thackeray and Shinde factions across seven wards. Key contests include ex-Mayor Pednekar against Kusale, and infighting impacting Koliwada. Development issues and Telugu votes are pivotal.
Web Summary : वर्ली में सात वार्डों में ठाकरे और शिंदे गुटों के बीच महत्वपूर्ण लड़ाई है। प्रमुख मुकाबलों में पूर्व महापौर पेडनेकर बनाम कुसले और कोलीवाड़ा को प्रभावित करने वाली अंदरूनी कलह शामिल हैं। विकास के मुद्दे और तेलुगु वोट महत्वपूर्ण हैं।