विमानतळावर प्रवाशांचे पैसे चोरतंय कोण?; व्यावसायिकाच्या बॅगेतून ९ लाख काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 07:29 IST2023-03-29T07:28:57+5:302023-03-29T07:29:22+5:30
आठवडाभरातील हा दुसरा प्रकार असल्याचे निदर्शनास आले आहे.

विमानतळावर प्रवाशांचे पैसे चोरतंय कोण?; व्यावसायिकाच्या बॅगेतून ९ लाख काढले
मुंबई : मुंबईवरून दुबईला विमानाने प्रवास करणाऱ्या व्यावसायिकाच्या बॅगेतून ४० हजार दिरम अर्थात ८ लाख ८० हजार रुपये चोरीला गेले. याप्रकरणी सहार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. आठवडाभरातील हा दुसरा प्रकार असल्याचे निदर्शनास आले आहे.
तक्रारदार अमरदीप कपूर सिंग हे २१ मार्चला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा अधीश राणा याच्यासोबत दुबईला निघाले होते. विमानाचे मध्यरात्री १ वाजता दुबई टी १ टर्मिनल येथे लँडिंग झाले. सिंग तेथून दुबईच्या एमिरेट ग्रँड हॉटेल येथे पोहोचले आणि त्यांनी बॅग उघडून पाहिली. तेव्हा ४० दिरम त्यांच्या बॅगेतून गायब झाले होते. त्यांचे कपडे आणि अन्य वस्तू सुस्थितीत होत्या. मुंबई विमानतळावर पैसे चोरल्याचा संशय सिंग यांनी व्यक्त केला आहे.
चेक इन संशयास्पद!
इव्हेंट मॅनेजर आयुशी अग्रवाल या मध्य प्रदेशच्या तरुणीनेही २० मार्चला सहार पोलिसांत चोरीची तक्रार दिली आहे. तिच्या बॅगेतून भारतीय चलनातील ५० हजार व ७ हजार दिरम असे २ लाख १४ हजार ५०० रुपये चोरण्यात आले. ती १३ मार्चला मैत्रिणीसह दुबईला निघाली होती. तिने सामान लगेजमध्ये चेक इनसाठी पाठविले होते.