Who Is BJP Ritu Tawade: भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष आहे. पक्ष जो निर्णय घेतो, तो आम्हाला मान्य असतो. माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. सर्वांचे आभार मानते. मुंबईची महापौरपदी निवड झाली असली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. महापौरपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेक निवडून आले आहेत. सभागृहाची गौरव कायम ठेवून मुंबईच्या हितासाठी पक्षभेद विसरून सर्वांनी निर्मळ आणि प्रामाणिक काम करावे अशी माझी अपेक्षा आहे, अशी पहिली प्रतिक्रिया रितू तावडे यांनी दिली. मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपाकडूनरितू तावडे यांचे नाव निश्चित करण्यात आले. तर उपमहापौरपदासाठी शिंदेसेनेचे नगरसेवक संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. संजय घाडी यांचा कार्यकाळ पहिली सव्वा वर्षे असणार आहे.
ठाकरे बंधूना पराभवाची धूळ चारत भाजपा-शिंदेसेनेने मुंबई मनपा निवडणूक बहुमताचा आकडा गाठत जिंकली. यानंतर मुंबईचे महापौरपद ‘सर्वसाधारण प्रवर्ग – महिला’ या गटासाठी आरक्षित झाले. मुंबईचा महापौर कोण होणार, यावरून अनेक तर्क-वितर्क, दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. अखेरीस भाजपा आणि शिंदेसेनेने महापौर, उपमहापौर पदासाठी रितू तावडे आणि संजय घाडी यांच्या नावाची घोषणा केली.
कोण आहेत रितू तावडे?
- रितू तावडे या घाटकोपर येथील प्रभाग क्रमांक १३२ मधून दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
- ५३ वर्षीय तावडे या भाजपच्या अभ्यासू नेत्या मानल्या जातात.
- रितू तावडे यांनी मुंबई मनपाच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे
- रितू तावडे या मुंबई मनपाच्या स्थापत्य समितीच्या उपाध्यक्ष राहिल्या आहेत.
- ईशान्य मुंबईतील भाजपाचा एक आक्रमक चेहरा म्हणून रितू तावडे यांची ख्याती आहे.
- रितू तावडे यांनी महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले आहे.
- सध्या त्या मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समितीच्या संयोजिका आहेत.
- रितू तावडे यांची ओळख केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही, तर जनसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणाऱ्या नेत्या म्हणून आहे.
- महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या बीभत्स जाहिराती आणि पुतळ्यांविरोधात रितू तावडे यांनी पुकारलेल्या लढ्याची दखल खुद्द ‘बीबीसी लंडन’ने घेतली होती. या आंदोलनामुळे अशा जाहिरातींवर बंदी घालण्यात आली.
- रितू तावडे यांनी पालिका शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी करत प्रशासनाला धारेवर धरले होते.
- घाटकोपरमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी रितू तावडे यांनी काढलेला ‘हंडा मोर्चा’ अत्यंत गाजला. यानंतर प्रशासनाने पाणी चोरणाऱ्यांवर कडक कारवाई केली.
- रितू तावडे या ‘मराठा प्रतिष्ठा’ संस्थेच्या अध्यक्षा असून, ‘महिला आर्थिक विकास महामंडळाच्या’ माध्यमातून हजारो महिलांना रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या आहेत.
मुंबईच्या महापौरपदासाठी रितू तावडे यांचे नाव निश्चित करण्यामागे महत्त्वाची ५ कारणे
- रितू तावडे घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मधून निवडून येतात, जो भाग प्रामुख्याने गुजराती बहुल आहे. भाजपासाठी हा सर्वांत मोठा मास्टरस्ट्रोक आहे. यामुळे भाजपाला मराठी मतदारांची सहानुभूती मिळेलच. पण गुजराती मतदारांमध्येही आपला प्रतिनिधी सर्वोच्च पदावर असल्याचा विश्वास निर्माण होईल.
- रितू तावडे यांची ही नगरसेवक म्हणून दुसरी टर्म आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद अत्यंत प्रभावीपणे भूषवले आहे.
- महापालिकेतील गुंतागुंतीचे विषय आणि प्रशासकीय कामकाज हाताळण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर ठेवलेला वचक यामुळे त्या एक अभ्यासू नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात.
- गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून भाजपाचा महापौर अ-मराठी असेल असा प्रचार केला जात होता. मात्र, रितू तावडे या मराठी असल्याने त्यांच्या रूपाने एक खंबीर मराठी चेहरा भाजपाने महापौरपदाच्या शर्यतीत उतरवला आहे.
- ५३ वर्षीय रितू तावडे या केवळ अनुभवीच नाहीत, तर त्या आक्रमक वक्त्या म्हणूनही ओळखल्या जातात. सभागृहात विरोधकांच्या टीकेला प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपाला एका कणखर नेतृत्वाची गरज होती, जी तावडे यांच्या रूपाने पूर्ण होईल, असे म्हटले जात आहे.
- नगरसेवक पदाच्या दोन टर्ममध्ये रितू तावडे यांची प्रतिमा स्वच्छ राहिली आहे. घाटकोपर हा भाजपाचा अभेद्य बालेकिल्ला असून तिथे त्यांनी केलेली बांधणी पक्षाला अधिक मजबूत करणारी ठरली आहे.
- महिला आरक्षण असल्याने भाजपाकडे इतरही नावे होती, परंतु रितू तावडेंचा प्रशासकीय अनुभव सर्वाधिक असल्याने त्यांचे पारडे जड ठरल्याचे म्हटले जात आहे.
Web Summary : BJP nominates Ritu Tawade for Mumbai Mayor, Sanjay Ghadi for Deputy. Tawade, a two-time corporator, is known for her advocacy on women's issues and experience in municipal affairs. Her selection aims to appeal to Gujarati voters and project a strong Marathi face, capitalizing on her administrative experience.
Web Summary : भाजपा ने ऋतु तावडे को मुंबई का महापौर और संजय घाडी को उपमहापौर नामित किया। तावडे, दो बार की नगरसेविका, महिला मुद्दों और नगरपालिका मामलों में अपने अनुभव के लिए जानी जाती हैं। उनका चयन गुजराती मतदाताओं को आकर्षित करने और एक मजबूत मराठी चेहरा पेश करने के उद्देश्य से किया गया है, जो उनके प्रशासनिक अनुभव का लाभ उठाएगा।