शॉर्टसर्किट झाल्यास जबाबदार कोण? रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर लोंबकळणाऱ्या वायरमुळे धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:52 IST2025-06-07T13:52:02+5:302025-06-07T13:52:16+5:30
स्टेशनमधील दुकानांमध्ये इलेक्ट्रिक इंडक्शनचा वापर

शॉर्टसर्किट झाल्यास जबाबदार कोण? रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर लोंबकळणाऱ्या वायरमुळे धोका
महेश कोले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गांवरील अनेक स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर विद्युत वायर लोंबकळत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात शॉर्टसर्किट होण्याचा धोका आहे. चर्चगेट स्टेशनवरील दुकानाला गुरुवारी लागलेल्या आगीप्रमाणे काही अनपेक्षित घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न सुज्ञ प्रवासी विचारत आहेत.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर, मरिन लाइन्स, मुंबई सेंट्रल अशा अनेक महत्त्वाच्या स्टेशनवर अलिकडेच डागडुजी, पुलांची कामे, छताची कामे करण्यात आली. यावेळी प्लॅटफॉर्मवर विद्युत वायर उघड्यावर आल्या. अनेक ठिकाणी त्या लोंबकळत आहेत. एखाद्या ठिकाणी उंदराने वायर कुरतडली असल्यास किंवा चुकून वायर उघड्या राहिलेल्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी पडल्यास शॉर्टसर्किटसारखी दुर्घटना होऊन आग लागण्याची शक्यता आहे. आमच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वायर सुस्थितीत ठेवाव्यात, त्यावर अच्छादन टाकावे, अशी मागणी होत आहे.
कुर्ला स्टेशनमधील इंडिकेटर बंद
कुर्ला स्टेशनच्या सर्व प्लॅटफॉर्मवरील इंडिकेटर गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारपर्यंत बंद पडले होते. याबाबत कुर्ला येथील उपस्थानक व्यवस्थापकांना विचारले असता पावसामुळे शॉर्टसर्किट झाल्याने यंत्रणेत काही बिघाड झाला होता. परिणामी हे इंडिकेटर बंद असल्याचे त्यांनी सांगितले.
दुकानांमध्ये इलेक्ट्रिक इंडक्शनचा वापर
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरील अनेक स्टेशनवरील दुकानांमध्ये खाद्यपदार्थ गरम करण्यासाठी इलेक्ट्रिक इंडक्शनसारख्या उपकरणांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये छोट्याशा चुकीमुळेही पुन्हा अशा घटना घडण्याची भीती असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने वारंवार सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तपासणी करणे आवश्यक आहे.
‘थ्री फेजच्या पैशांमध्ये सिंगल फेजची जोडणी’
पश्चिम रेल्वेवरील काही दुकानदारांचे म्हणणे आहे की, रेल्वेने त्यांच्याकडून व्यावसायिक वापरासाठीच्या विद्युत जोडणीसाठी थ्री फेजचे पैसे घेतले आहेत. जोडणी मात्र सिंगल फेजची दिली आहे. त्यामुळे अनेकदा उच्च क्षमतेच्या विद्युत उपकरणांमुळे जोडणीवर ताण येतो. परिणामी अनपेक्षित घटना घडण्याचा धोका संभवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
चर्चगेट स्थानकात दुसऱ्या दिवशीही दर्प
चर्चगेट स्टेशनमध्ये गुरुवारी एका दुकानाला आग लागली होती. या घटनेत दुकानातील साहित्य जळून खाक झाल्यामुळे येणारा एक प्रकारचा उग्र दर्प शुक्रवारीही येत होता. दरम्यान, इतर दुकानदारांच्या मते ही आग किमान अर्धा तास धुमसत होती.