मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक परिसरातील मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाची पूर्ण रया गेली आहे. कार्यालयाच्या बाहेर खिडक्यांच्या तुटलेल्या काचा आणि कचरा पडलेला आहे. विशेष म्हणजे कार्यालयात असलेल्या एक-दोन कर्मचाऱ्यांशिवाय येथे पूर्णतः शुकशुकाट असून हीच मुंबईतल्या काँग्रेसची अवस्था दर्शवणारी स्थिती आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर काँग्रेसकडून त्याचा अत्यंत क्षीण प्रतिकार आणि निषेध करण्यात आला. या घटनेला एक महिना उलटला तरी अद्याप या कार्यालयाची डागडुजी करण्यात आलेली नाही. इतकेच काय कार्यालयाच्या बाहेर फाटलेले पोस्टर, तुटलेल्या खुर्च्या आणि कुणीतरी प्लास्टिकच्या रिकाम्या बरण्यांमध्ये भरून ठेवलेले पाणी असे चित्र दिसते.
कसले आंदोलनही नाही, काेणती दिशाही नाहीभाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर काही दिवस मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड मुंबईबाहेर होत्या. सध्या कार्यालयात नेहमीच शुकशुकाट असतो. कार्यकर्त्यांनी नेमके काय करायचे, याची दिशा त्यांना मिळत नाही. त्यामुळे कोणतेही आंदोलन अथवा मोहीम राबवली जात नाही. कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता, काही महिन्यांचे वेतन मिळाले नसल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर तोडफोड झालेल्या काचा आणि इतर वस्तूंची दुरुस्ती करण्याचे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मात्र, कंत्राटदार जागेवर नसल्याने कामाला विलंब होत आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत मला माहिती नाही, कारण मी स्वतः आजारी असल्याने कार्यालयात गेलेलो नाही. याबाबत कोषाध्यक्ष संदीप शुक्ला हेच अधिक माहिती देऊ शकतील.- निजामुद्दीन राईन, प्रवक्ते, काँग्रेस